दिल्ली, उत्तराखंड, बिहार विजयी
उपकनिष्ठांची पुरूष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
वृत्तसंस्था, राजगीर
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या पुरूषांच्या 16 व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत दिल्ली, उत्तराखंड आणि बिहार यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले. दिल्लीने या स्पर्धेतील ब विभागातील सामन्यात गुजरातवर 30 गोलांनी दणदणीत विजय मिळविला.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या ब विभागातील अ गटातील सामन्यात दिल्लीने गुजरातवर 30 गोलांचा वर्षाव केला. या सामन्यात गुजरातला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. ब विभागातील अन्य एका सामन्यात उत्तराखंडने तेलंगणाचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले. ब विभागातील तिसऱ्या सामन्यात छत्तीसगडने कर्नाटकाचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. क विभागातील सामन्यात जम्मू-काश्मीरने राजस्थानवर 2-1 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. अ गटातील सामन्यात मिझोरामने आंध्रप्रदेशचा 4-0 असा एकतर्फी पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले. ब विभागातील शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात बिहारने हिमाचलप्रदेशचा 3-1 असा पराभव केला. आसाम आणि पुद्दुचेरी यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला.