दिल्लीच्या पर्यटकाने स्थानिक वृद्ध महिलेला चिरडले
जुनसवाडा मांद्रे येथील घटना, महिलेचा जागीच मृत्यू , श्वानांवरुन झालेल्या भांडणानंतर गाडीने ठोकरल्याचा आरोप
पेडणे (प्रतिनिधी)
राज्यात दिल्लीवाले व स्थानिकांमधील क्षुल्लक वाद सध्या विकोपाला पोहोचत आहेत. जुनसवाडा मांद्रे येथे शुक्रवारी रात्री 10.30 वा. श्वान त्रास देत असल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचे पर्यावसान कार अंगावर घालून चिरडण्यापर्यंत पोहोचले. यात स्थानिक वृद्ध महिला मेरी फेलिज फर्नांडिस (65) हिचा मृत्यू झाला असून कारचालक दीपन राजू बत्रा (23, दिल्ली) याला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्लीतील बत्रा कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून दांडोसवाडा मांद्रे परिसरात वास्तव्यास आहेत. ते रोज रात्री आपले दोन श्वान घेऊन कार क्र. डीएल 4 सीबीसी 2576ने दांडोसवाडा मार्गे जुनसवाडा समुद्रकिनारी फेरफटका मारण्यास जात असत. जुनसवाडा येथील मेरी फेलिक्स फर्नांडिस यांच्या मालकीचेही दोन श्वान आहेत. बत्रा कुटुंबिय या मार्गे जाताना या श्वानांमध्ये दररोज भांडण होऊन मोठमोठ्याने आवाज होत होता. त्यामुळे वैतागून मेरी फेलिक्स फर्नांडिस यांनी शुक्रवारी रात्री बत्रा कुटुंबीयांना जाब विचारला व तुमच्या श्वानांना आवरा असे सांगितले. त्यावेळी पर्यटक दीपन बत्रा याच्या आईने मेरी फर्नांडिस हिच्याबरोबर भांडण केले. भांडण मिटवून बत्रा कुटुंबीय समुद्रकिनारी गेले. तेथून परत कारने येताना दीपन राजू बत्रा याने रस्त्याच्या बाजूला बसलेल्या वयोवृद्ध मेरी फेलिक्स फर्नांडिस हिला धडक देऊन चिरडले. यात मेरी फर्नांडिसचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मांद्रे पोलिसांकडे धाव घेतली. तत्पूर्वीच सदर संशयित कुटुंबीय मांद्रे पोलिसांना शरण आले होते.
मांद्रे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत दीपन राजू बत्रा यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 व 281 अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली. पुढील तपास मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस करत आहेत. मेरी फेलिज फर्नांडिस यांचे त्यांच्या घराशेजारीच छोटेखानी शहाळी विकण्याचे दुकान असून दररोज तेथे बसून ती पर्यटकांना शहाळी विकायची.
हा एक खुनाचाच प्रकार
स्थानिक पंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी सांगितले की, समुद्रकिनारी दिल्लीवाल्यांची दादागिरी वाढली असून क्षुल्लक कारणावरुन दररोज स्थानिकांबरोबर त्यांची भांडणे सुरु असतात. बत्रा कुटुंबीयांच्या श्वानामुळे येथे स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांना फोनद्वारे दिली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. बत्रा कुटुंबीयांना सांगितल्यास त्यांनी भाडण केले. शुक्रवारी रात्री मेरी फर्नांडिस यांच्यासोबतही श्वानांवरुन बत्रा कुटुंबीयांचे भांडण झाले. यावेळी दीपन बत्राच्या आईने मेरी फर्नांडिस यांना मारहाण केली. स्थानिकांनी हे भांडण मिटविले मात्र तो राग मनात असलेल्या दीपनने समुद्रकिनाऱ्यावरुन परत येताना रस्त्याच्या कडेला खुर्चीवर बसलेल्या मेरी फर्नांडिसवर गाडी घालून तिला चिरडले. त्यातच तिचा मृत्यू झाला. हा अपघात नसून मुद्दामहून केलेला खून असल्याचे त्यांनी सांगितले. मांद्रे पोलिसांनी या घटनेविषयी जे जे कोण दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही फर्नांडिस यांनी केली आहे.