For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली एसआयआरमध्ये 33 लाख मतदारांना नोटीस; आडवाणी, सिसोदिया, केजरीवाल आणि सिब्बल यांचाही समावेश

06:54 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली एसआयआरमध्ये 33 लाख मतदारांना नोटीस  आडवाणी  सिसोदिया  केजरीवाल आणि सिब्बल यांचाही समावेश
Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान सुमारे 33.13 लाख मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.

Advertisement

निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नोटीस मिळणे म्हणजे मतदाराचे नाव अंतिमतः मतदार यादीतून वगळले जाणे नव्हे. संबंधित व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे आणि स्पष्टीकरण सादवल्यानंतर नोंदींची पडताळणी करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

आडवाणी आणि कुटुंबीयांनाही नोटीस

लालकृष्ण आडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा आणि सून गीतिका यांच्या मतदार नोंदींचे 2002 मधील जुन्या एसआयआर मतदार यादीशी अपेक्षित पद्धतीने जुळवणी न झाल्याने त्यांना नोटीस देण्यात आल्याचे वृत्त आहे. आडवाणी कुटुंबातील जयंत यांची नोंद मात्र या प्रक्रियेत जुळल्याचे सांगण्यात आले आहे. हे सर्व मतदार नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत.

Advertisement

मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबातील नोंदींचीही पडताळणी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यांच्या पत्नी सीमा आणि मुलगा मीर यांनाही एसआयआर अंतर्गत नोटिसा मिळाल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जुन्या मतदार नोंदींशी नाव किंवा कुटुंबीयांच्या तपशीलांची जुळवणी न होणे अथवा नोंदीतील विसंगती ही त्यामागची कारणे आहेत.

केजरीवाल आणि कुटुंबातील पाच जणांना नोटीस

माजी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना नोटीस देण्यात आली आहे. केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता, मुलगा पुलकित तसेच आई-वडिलांच्या नोंदी 2002 च्या मागील SIRशी लिंक करता न आल्याने त्यांना ‘Unmapped with Last SIR’ श्रेणीत नोटीस देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची नोंद पडताळणीनंतर वैध

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनाही त्यांच्या मतदार नोंदीतील विसंगतीमुळे नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या नोंदीत पालकांच्या तुलनेत वयातील फरकासंबंधी विसंगती आढळली होती. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेनंतर त्यांची मतदार नोंद वैध ठरवण्यात आली असून, शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

33.13 लाख मतदारांना नोटीस

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, मसुदा मतदार यादीत समाविष्ट असलेल्या 33.13 लाख मतदारांच्या गणना अर्जातील तपशीलांमध्ये विसंगती आढळल्याने त्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 19 सप्टेंबरपर्यंत यापैकी सुमारे 31.63 लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

यातील मोठा भाग 2002 मध्ये झालेल्या मागील SIRमधील मतदार नोंदींशी सध्याच्या तपशीलांची जुळवणी न होण्याशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मसुदा मतदार यादीतून 47 लाखांहून अधिक नावे वगळली

दिल्लीतील SIR प्रक्रियेदरम्यान 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीत सुमारे 47.5 ते 47.6 लाख नावे समाविष्ट झाली नव्हती. संबंधित मतदारांना त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा आणि हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

अंतिम निर्णय पडताळणीनंतरच

निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या प्रकरणात कागदपत्रे, तथ्य आणि संबंधित नोंदींची तपासणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. दिल्लीची अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेत नोटिसा का देण्यात आल्या आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या निकषांबाबत पारदर्शकतेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.