दिल्ली धार्मिक दंगल : पाच आराेपींना जन्मठेप
‘धर्मा’च्या नावावर अत्याधिक क्रूरता, अंकित शर्मा हत्या प्रकरणी दिल्ली कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय
फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत झालेल्या भीषण धार्मिक दंगलीतील पाच आरोपींना दिल्लीच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी (आयबी) अंकित शर्मा यांची क्रूर हत्या केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ताहीर हुसेन हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह चार अन्य आरोपींनाही दोषी धरण्यात आले आहे. अंकित शर्मा हे ईशान्य दिल्लीतील दयालपुरा भागात झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडले होते. अंकित शर्मा यांची हत्या हे धर्माच्या नावाखाली झालेल्या अतिक्रूर गुन्ह्याचे प्रतीक आहे, अशी टिप्पणी दिल्लींच्या कडकडदुमा न्यायालयाने आपल्या महत्वपूर्ण निर्णयात स्पष्टपणे केली.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हत्या झाली तेव्हा अंकित शर्मा यांचे वय केवळ 26 वर्षांचे होते. दंगल उसळल्यानंतर ईशान्य दिल्ली भागात ते शांतता राखण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हिंस्त्र जमावाने हल्ला चढविला. त्यांना मारहाण करुन आणि भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह जनावराच्या मृतदेहाप्रमाणे ओढत नेण्यात आला आणि नाल्यात फेकण्यात आला. दिल्लीत त्यावेळी झालेल्या हिंसेच्या अनेक सर्वात भीषण प्रकरणांपैकी हे एक होते. कडकडदुमान न्यायालयाने आपल्या निर्णयात या भीषणतेवर अत्यंत कठोर भाषेत टिप्पणी केलेली आहे.
शुक्रवारी शिक्षा
न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच या पाच आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या अनुसार आरोपींवर गुन्हा सिद्ध होत आहे. त्यामुळे या पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. या हत्या प्रकरणात ताहीर हुसेन याच्यासह सलमान, नझीम, कासीम, समीर खान, अनाझ, फिरोझ, जावेद, गुलफाम, शोएब अलम, मुंतजीम आणि मुसा यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले होते. त्यांच्यापैकी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इतरांनाही कमी अधिक प्रमाणात शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
दिल्ली दंगल प्रकरण
फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत सुधारीत नागरीकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी हिंसाचार करण्यात आला होता. याच हिंसाचाराचे पर्यवसान भीषण धार्मिक दंगलीत झाले होते. त्या दंगलीत किमान 42 नागरीकांचा मृत्यू झाला होता. अनधिकृत आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. याच दंगलीत अंकित शर्माही मृत्यूमुखी पडले होते. दंगल ताहीर हुसेन याने घडविल्याचा आरोप आहे.
कपिल शर्मा यांना समाधान
अंकित शर्मा यांना न्याय मिळण्यास प्रारंभ झाला आहे, अशा शब्दांमध्ये दिल्लीचे कायदा मंत्री कपिल शर्मा यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिल्ली दंगल हा धर्मांधतेचा कळस होता. या दंगलीत भारताने अंकित शर्मा यांच्यासारखा तरुण आणि तडफदार युवा गुप्तचर अधिकारी गमावला. ही साऱ्या देशाची हानी आहे. आरोपींना यापेक्षाही कठोर शिक्षा व्हावयास हवी होतीं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही या निर्णयावर समाधान व्यक्त करताना, आम आदमी पक्षावर जोरदार टीकाप्रहार केले आहेत.
केवळ धार्मिक हेतूने हत्या
अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी निर्णय देताना न्यायाधीश पुलस्त्य यांनी काही गंभीर निरीक्षणे नोंदविली आहेत. अंकित शर्मा यांची हत्या केवळ धर्मांध उद्देशानेच करण्यात आली आहे. हा धार्मिक उन्मादाचा आणि क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी शर्मा यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहालाही भोसकले, अशी टिप्पणी करताना त्यांनी हे प्रकरण धर्मांधतेचे असल्याची नोंद केली आहे.
अंकित शर्मा यांना न्याय
दंगल भडकविणारा ताहीर हुसेन हा आम आदमी पक्षाचा नगरसेवक
आयबीचे तरुण अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या धर्माच्या नावाखाली
ही हत्या म्हणजे धर्मांधतेचा कळस असल्याची न्यायाधीशांकडून टिप्पणी