दिल्ली-लखनौच्या मोहिमेस आज प्रारंभ
मागील हंगामातील अपयशामुळे ‘एलएसजी’चा कर्णधार रिषभ पंतवर राहील
वृत्तसंस्था / लखनौ :
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतच्या दृष्टीने या महत्त्वाच्या वर्षात चुकांना फारसा वाव नसेल. या पार्श्वभूमीवर त्याचा संघ आज बुधवारी लखनौमध्ये अष्टपैलू दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या सामन्याने आयपीएल 2026 मोहिमेला सुऊवात करणार आहे.
एलएसजीमधील आपल्या पहिल्या वर्षात पंत एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून कामगिरी करू शकला नाही. महत्त्वाच्या खेळाडूंना, विशेषत: वेगवान गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे त्याचे काम अधिकच कठीण झाले होते. या हंगामात त्याच्याकडे पूर्णपणे तंदुऊस्त संघ उपलब्ध असून अनुभवी खेळाडू मोहम्मद शमी आणि एनरिक नॉर्टजे यांच्या समावेशाने त्यांना अधिक बळकटी मिळाली आहे.
दुखापतींनी त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज मयंक यादवने गेल्या 12 महिन्यांपासून आपल्या तंदुऊस्तीवर खूप मेहनत घेतली आहे आणि एलएसजीला आशा आहे की, संघाने त्याच्यावर ठेवलेल्या दृढ विश्वासाची तो परतफेड करेल. वेगवान गोलंदाज मोहसिन खानदेखील दुखापतीतून पुनरागमन करत आहे, तर प्रिन्स यादवनेही आतापर्यंत नेटमध्ये आपल्या मध्यमगती गोलंदाजीने प्रभावित केले आहे. ‘मिस्ट्री स्पिनर’ दिग्वेश सिंग राठीने आपल्या पदार्पणाच्या हंगामात नाव कमावले आणि 12 महिन्यांपूर्वी मिळविलेल्या प्रचंड यशाच्या पायावर तो आपली कामगिरी अधिक उंचावण्याचा प्रयत्न करेल.
गोलंदाजी विभागाच्या तुलनेत फलंदाजी अधिक स्थिर दिसत आहे, ज्यात मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांचा समावेश असून आयपीएलमधील सर्वांत घातक सलामीच्या जोड्यांपैकी ही एक आहे. गेल्या हंगामात बहुतांश वेळा चौथ्या क्रमांकावर प्रभाव पाडू न शकलेला आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावलेला पंत आता वरच्या फळीत फलंदाजीसाठी सज्ज आहे, तर त्याच्या पाठोपाठ निकोलस पूरन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.
एलएसजीचा सामना अशा संघाशी आहे, ज्याने गेल्या वर्षी आश्वासक सुऊवातीनंतर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायला हवे होते. दिल्ली कॅपिटल्सने गेल्या वर्षी तब्बल सात सलामीच्या जोड्या आजमावल्या होत्या आणि या हंगामात त्यांना आघाडीच्या फळीत अधिक स्थिरतेचा विश्वास आहे. के. एल. राहुल डावाची सुऊवात करणार हे निश्चित आहे, परंतु त्याच्या जोडीदाराबद्दल पुरेशी स्पष्टता नाही. पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल व पथुम निसांका हे पर्याय उपलब्ध आहेत. दक्षिण आफ्रिकी खेळाडू ट्रिस्टन स्टब्सचा समावेश असलेल्या मधल्या फळीला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांनी डेव्हिड मिलरला संघात घेतले आहे.
पहिल्या सामन्यासाठी मिचेल स्टार्क दुखापतीमुळे अनुपलब्ध असूनही दिल्ली कॅपिटल्सकडे एक प्रभावी गोलंदाजी आक्रमण आहे. कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने त्यांच्याकडे दोन सामना जिंकून देणारे फिरकी गोलंदाज आहेत. धूर्त लुंगी एनगिडीच्या समावेशामुळे वेगवान मारा अधिक मजबूत झालेला आहे. टी-20 विश्वचषकात एनगिडी आपल्या सर्वोत्तम लयीत होता. आपल्या गतीतील चलाख बदलांनी त्याने फलंदाजांना अचंबित केले होते. दुखापतीमुळे गेले वर्षभर मैदानाबाहेर राहिल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनही आता पूर्णपणे तंदुऊस्त झाला आहे.
संघ-लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, आयुष बदोनी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंह राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, एनरिक नॉर्टजे.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, पृथ्वी शॉ, पथुम निसांका, डेव्हिड मिलर, नितीश राणा, विपराज निगम, औकिब नबी दार, लुंगी एनगिडी, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.