दिल्ली जगातील सर्वात प्रदुषित शहर
एक्यूआय 506 पर्यंत घसरला : सर्व शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांवर बंदी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण वाढतच आहे. गुरुवारी, दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 506 या धोकादायक श्रेणीपर्यंत घसरला होता. या नोंदीनुसार जगभरातील वायू प्रदूषण मोजणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘आयक्यू एअर’ने दिलेल्या लाईव्ह रँकिंगमध्ये दिल्लीला जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून स्थान देण्यात आले. वाढत्या वायू प्रदुषणामुळे दिल्ली सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांवर बंदी घातली आहे. यापूर्वी, 18 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील प्रदुषणामुळे दिल्लीच्या शाळांमध्ये क्रीडा कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
राजधानी दिल्लीसह आजुबाजुच्या राज्यांमध्ये सध्या प्रदुषणासह थंडी व धुक्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. प्रदुषणाची ही धोकादायक पातळी आरोग्यासाठी धोकादायक आहे. ‘आयक्यू एअर’च्या लाईव्ह वर्ल्ड रँकिंगनुसार, 20 नोव्हेंबर रोजी दिल्लीनंतर उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद 251 च्या एक्यूआयसह दुसऱ्या क्रमांकावर होती. पाकिस्तानमधील लाहोर शहर (एक्यूआय 215) तिसऱ्या क्रमांकावर होते. तर बांगलादेशची राजधानी ढाका 211 च्या एक्यूआयसह चौथ्या क्रमाकांवर होते. तसेच भारतातील कोलकातामध्येही 211 इतका एक्यूआय नोंद झाला आहे. या आकडेवारीवरून दक्षिण आशियातील अनेक प्रमुख शहरांमध्ये हवा गुणवत्ता घसरल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या 15 दिवसांपासून मध्यप्रदेशात तीव्र थंडी जाणवत आहे. गेल्या 24 तासांत, भोपाळ आणि इंदूरसह 12 शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. राजगडमध्ये सर्वात कमी 7.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याचदरम्यान जबलपूर दाट धुक्याने वेढले गेले होते. शुक्रवारी इंदूर, भोपाळ, राजगड, शाजापूर आणि सेहोर येथे थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथे तापमान उणे 6 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. सकाळी मैदानी भागात धुके पसरल्याचेही दिसून आले. हवामानशास्त्रज्ञांच्या मते पुढील काही दिवस राज्यात हवामान असेच राहण्याची शक्यता आहे.
लोकांच्या आरोग्यावर परिणाम
दिल्ली-एनसीआरमध्ये सतत वाढणाऱ्या प्रदुषणाचा लोकांच्या आरोग्यावर स्पष्ट परिणाम होत आहे. रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 500 पेक्षा जास्त एक्यूआय पातळीमुळे दमा, ब्राँकायटिस, फुफ्फुसांचे संसर्ग आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. भारतातील इतर दोन प्रमुख शहरे, मुंबई (एक्यूआय 160) आणि कोलकाता (एक्यूआय 211) देखील टॉप 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई व कोलकाता ही दोन्ही महानगरेही गंभीर प्रदुषणाचा सामना करत आहेत.