दिल्ली सरकार देणार 2,500 रुपये
राज्यात ‘लक्ष्मी योजना’ लागू, निवडणुकीच्या वेळचे आणखी एक आश्वासन पूर्ण, महिलांमध्ये समाधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली सरकारने ‘लक्ष्मी’ योजनेच्या अंतर्गत दिल्ली राज्यातील पात्र महिलांना प्रतिमहीना 2 हजार 500 रुपयांचे मानधन देण्यास प्रारंभ केला आहे. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेले आणखी एक आश्वासन पूर्ण केले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही घोषणा मंगळवारी केली. या योजनेच्या अंतर्गत नियमानुसार पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यांवर रक्षाबंधनाच्या सुमुहूर्तावर या रकमेचा प्रथम हप्ता जमा होणार आहे. तोपर्यंत महिलांनी सादर केलेल्या आवेदनपत्रांच्या छाननीचे काम पूर्ण होणार आहे.
दिल्ली सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला संमती दिली आहे. या योजनेचा लाभ उठविण्यासाठी महिलांकडून यापूर्वीच आवेदनपत्रे मागविण्यात आली आहेत. आता या आवेदनपत्रांच्या छाननीचे काम होत असून ते लवकरच पूर्ण होईल. ज्या महिला या योजनेच्या नियमांच्या अनुसार पात्र ठरतील, त्यांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये दिले जातील. या योजनेचे नियम दिल्ली सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहेत. हे नियम आता कठोरपणे लागू केले जाणार आहेत.
दिल्लीच्या महिलांचे अभिनंदन
या योजनेच्या कार्यान्वयनाची घोषणा करताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या महिलांचे अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर सव्वा वर्षांच्या आत एक महत्वाचे आश्वासन पूर्ण केले आहे. ही 2 हजार 500 रुपयांची रक्कम दिल्लीच्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच काही महिलांना वैद्यकीय उपचारांसाठी, काही महिलांना त्यांच्या अपत्यांच्या शिक्षण खर्चासाठी, काही कुटुंबांच्या दैनंदिन खर्चासाठी, अशा विविध प्रकारे उपयोगी ठरणार आहे. या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास दुणावणार असून त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साहाय्यभूत ठरेल. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारेल, असे प्रतिपादन गुप्ता यांनी केले.
योजनेच्या अटी
दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या 18 वर्षे वयाच्या वरच्या महिलांना ही योजना लागू केली जाणार आहे. लाभार्थी महिला किमान 10 वर्षांपासून दिल्लीची निवासी असावयास हवी. तसेच या महिलेवर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप नसला पाहिजे. याशिवाय आणखी काही अटी आहेत. त्या सर्व काटेकोरपणे पूर्ण कराव्या लागतील. महिलांच्या अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यांना योजनेचा प्रथम हप्ता मिळणार आहे. अशा प्रकारे महिलांसाठी अशी योजना लागू करणारे दिल्ली हे देशातील सातवे राज्य ठरेल. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये ही योजना आहे.
केजरीवाल यांची योजना रद्द
दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता असताना ‘महिला सम्मान योजना’ लागू करण्यात आली होती. त्या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1 हजार रुपये दिले जात होते. नंतर ही रक्कम 2 हजार 100 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. 2025 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने या योजनेचे धन 2 हजार 500 रुपयांपर्यंत वाढविण्याचे आश्वासन दिले होते. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला होता. त्या पक्षाला दिल्ली विधानसभेतील 70 जागांपैकी 48 जागा मिळून दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत मिळाले होते. तर त्यापूर्वी सलग 10 वर्षे सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडून आली नव्हती. अशा प्रकारे दिल्लीतील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्यात सलग तीनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला भोपळाही फोडण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.
त्या राज्यांच्या पंक्तीत आता दिल्लीही
ड महिलांना प्रतिमहीना मानधन देणाऱ्या राज्यांमध्ये आता दिल्लीचाही समावेश
ड आम आदमी पक्षाच्या 2 हजार 100 रुपये योजनेच्या स्थानी ही नवी योजना
ड रक्षाबंधनाच्या आसपास नव्या योजनेचा शुभारंभ होणार असल्याची घोषणा
ड या योजनेमुळे महिलांचा आत्मसन्मान, आर्थिक स्वावलंबित्व वाढणे शक्य