दिल्ली सरकारला पुन्हा फटकारले
प्रदुषणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात अपयश आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली प्रशासन आणि दिल्ली राजधानी प्रशासन या दोन्ही संस्थांना फटकार दिली आहे. या प्रशासनांना प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात पूर्णत: अपयश आले असून जीआरएपी-4 पातळीची उपायोजना येत्या सोमवारपर्यंत कायम ठेवावी, असा आदेश दिला आहे. प्रदूषण कमी होत आहे. ते अधिक काळ टिकणार नाही. त्यामुळे प्रदूषण उपाययोजनांचा स्तर कमी करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी दिल्ली सरकारच्या वतीने करण्यात आली होती. न्यायालयाने ती फेटाळली. वायू गुणवत्ता व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी जीआरएपी-4 पातळीची उपाययोजना लागू करण्यात कुचराई केली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई केली जावी, असाही आदेश न्या. अभय ओक आणि न्या. मसीह यांनी दिला आहे.
गुरुवारी स्थिती पुन्हा खराब
गुरुवारी दिल्लीतील वायू प्रदूषणाची परिस्थिती पुन्हा खराब झाल्याचे दिसून आले. हवेची स्थिती ‘अत्यंत खराब’ या स्थितीपर्यंत पोहचली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा 301 ते 400 या पातळीवर गेला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना श्वसनाचे विकार जडत असून लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.