For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीचा शेवट गोड, केकेआरवर मात

06:50 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीचा शेवट गोड  केकेआरवर मात
Advertisement

सामनावीर कुलदीप यादव, एनगिडीचे 3 बळी : केएल राहुलचे अर्धशतक, रहाणेचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 40 धावांनी पराभवाचा धक्का दिला. ईडन गार्डन्सवर मिळवलेला हा विजय दिल्लीचा 7 वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे आता 14 गुण झाले आहेत. यामुळे त्यांनी कोलकातासह चेन्नईलाही मोठा धक्का दिला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 203 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा संघ 163 धावांत ऑलआऊट झाला.

Advertisement

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. फिन अॅलन 20 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मनीष पांडेही 25 धावांवर बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा करताना 39 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारासह 63 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. आक्रमक फलंदाज रोव्हमन पॉवेलने 29 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगला भोपळाही फोडता आला नाही. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे केकेआरचा संघ 18.4 षटकांत 163 धावांवर ऑलआऊट झाला.

तत्पूर्वी, दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 203 धावा केल्या. दिल्लीकडून केएल राहुलने 30 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार अक्षर पटेलने 25 चेंडूत 39 धावा केल्या, तर अभिषेक पोरेल (22), साहिल पारख (24), डेव्हिड मिलर (28) आणि आशुतोष शर्मा (नाबाद 18) यांनी छोटेखानी योगदान दिले.

केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत होता. पण मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे केकेआरची प्लेऑफची संधी हुकली. जर मुंबईने हा सामना जिंकला असता, तर केकेआर संघासमोर धावांचे समीकरण होते, पण असे काहीच झाले नाही. त्यामुळे हा सामना जिंकूनही कोलकाताला प्लेऑफपासून वंचित रहावे लागले. शेवटी दिल्लीने विजयाने हंगामाचा शेवट केला आहे.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 5 बाद 203 (अभिषेक पोरेल 22, केएल राहुल 60, अक्षर पटेल 39, डेव्हिड मिलर 28, आशुतोष शर्मा नाबाद 18, सौरभ दुबे 2 बळी, अनुकुल रॉय, सुनील नरेन आणि अय्यर प्रत्येकी 1 बळी)

केकेआर 18.4 षटकांत सर्वबाद 163 (अजिंक्य रहाणे 63, फिन अॅलन 20, मनीष पांडे 25, रोव्हमन पॉवेल 29, एनगिडी 27 धावांत 3 बळी, कुलदीप यादव 29 धावांत 3 बळी, मिचेल स्टार्क 2 बळी).

गुणतालिकेत दिल्ली सहाव्या तर केकेआर सातव्या स्थानी

दिल्लीने 14 गुण मिळवले असल्याने त्यांनी कोलकाता आणि चेन्नई यांना मागे टाकत सहावा क्रमांक मिळवत हंगामाचा शेवट केला. पण या पराभवामुळे कोलकाता 13 गुणांसह 7 व्या क्रमांकावर घसरले. तसेच चेन्नई सुपर किंग्सही 8 व्या क्रमांकावर घसरले. त्यांचे 12 गुण आहेत. 9 व्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, तर 10 व्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स संघ राहिले. मुंबई आणि लखनौ यांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. दरम्यान, बेंगळूर, गुजरात, हैदराबाद आणि राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पंजाबचा संघ पाचव्या स्थानी राहिला.

-केकेआरे शेवटचे 7 बळी केवळ 35 धावांत गमविले. रहाणे बाद झाल्यानंतर ही घसरण सुरू झाली.

-12 सामन्यांत 10 बळी मिळविणाऱ्या कुलदीपची हॅट्ट्रिक पोरेलने यष्टीमागे झेल सोडल्याने थोडक्यात हुकली

-साखळी फेरीअखेर पहिले पाच संघांचा रनरेट प्लसमध्ये तर तळाच्या पाच संघांचा रनरेट निगेटिव्ह राहिला.

Advertisement
Tags :

.