दिल्ली निवडणूक : तीन तिघाडा, काम बिघाडा ?
मिनी-इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये आजकाल एक अजब हलचल आहे. राजकीय बुद्धिबळाचे दोन ग्रँडमास्टर असलेल्या नेत्यात एक चुरशीचा मुकाबला नवीन वर्षात होऊ घातला आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र खिशात घातल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजर आता दिल्ली विधानसभेकडे वळली आहे आणि काही करून ती जिंकायची असा जणू त्यांनी पण केलेला आहे. गेली दहा वर्षे ज्यांची दिल्लीत एकहाती सत्ता आहे ते केजरीवाल हे लढाईला सज्ज झालेले आहेत व कुरुक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या या इंद्रप्रस्थ नगरीत तुंबळ युद्ध अपेक्षित आहे. येथे कोणी कौरव व पांडव नाही पण चुरस मात्र जबरदस्त आहे.
तीन-चार महिन्यापूर्वी केजरीवाल यांना तिसरी टर्म सहज मिळणार असे म्हणणारे लोक महाराष्ट्रातील भाजपच्या दैदिप्यमान विजयाने दिपून गेले आहेत व 26 वर्षे दिल्लीच्या सत्तेबाहेर असलेली भाजप आम आदमी पक्षाचा कात्रज करणार काय अशी शंका राजकीय निरीक्षकांना येऊ लागली आहे, पंतप्रधान गेली अकरा वर्षे नव्या दिल्लीचे बॉस आहेत पण दिल्ली राजधानी क्षेत्रात मात्र केजरीवाल यांचेच नाणे चलनी असल्याने मोदी अस्वस्थ आहेत व या वेळेला साम, दाम, दंड, भेद असा सर्व आयुधांचा वापर करून आम आदमी पक्षाला त्यांना सत्तेतून उखडावयाचे आहे. त्यामुळे या वेळच्या मुकाबल्यात रंगत येणार आहे. ‘अब नहीं सहेंगे, बदल कर रहेंगे’, अशी नवी घोषणा देऊन भाजपने प्रचाराला सुरुवात केलेली आहे. भाजपएवढे जबर निवडणूक तंत्र आतापर्यंत स्वतंत्र भारतात दिसलेले नाही एव्हढे ते अवाढव्य व प्रचंड आहे.
राजधानीतील भाजप आणि आपचे पोस्टर वॉर बघितले तर काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे की नाही असा प्रश्न पडावा. एकदा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले की मगच प्रचारासाठी ती पैसे खर्च करेल असे दिसत आहे. गेली दहा वर्षे केंद्रात आणि दिल्लीत वनवासात असल्याने त्याच्याकडे साधने फार कमी आहेत व ती म्हणूनच पुरवून पुरवून वापरण्याचा त्याचा नेहमी बेत असतो.
दिल्ली राजधानी क्षेत्रात (नॅशनल कॅपिटल टेरिटोरी ऑफ दिल्ली) मध्ये गेली 26 वर्षे भाजप सत्तेबाहेर आहे. सुषमा स्वराज या 1998 साली तिच्या शेवटच्या मुख्यमंत्री होत्या. गमतीची गोष्ट म्हणजे 2014 पासून झालेल्या तिन्ही लोकसभा निवडणूकांत राजधानी दिल्लीतील सातच्या सात जागा भाजपने जिंकल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथील मनपादेखील तिच्या ताब्यात होती. सत्तर सदस्यीय दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाचे 62 सदस्य आहेत तर भाजपचे केवळ 8. यातील काहींनी ‘आप’ला सोडचिट्ठी दिलेली आहे. काँग्रेस गेली दहा वर्षे भोपळाच आहे. त्याअगोदर पंधरा वर्षे काँग्रेसचे दिल्लीवर राज्य होते. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना दिल्लीचा सुवर्णकाळ होता असे मानले जाते. त्याकाळीच
कॉमनवेल्थ गेम्स भव्य प्रमाणात येथे भरवल्या गेल्या होत्या. यावेळी केजरीवाल यांच्यावर डाव उलटवण्यासाठी भाजपने दिवसरात्र एक केला आहे. केजरीवाल यांना त्यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात खिळवून ठेवण्यासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कै. साहेबसिंग वर्मा यांच्या मुलाला परवेश सिंग वर्माला उतरवले जात आहे. काँग्रेसने कै.शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित याला या मतदारसंघातून उतरवले आहे. प्रवेश व संदीप हे माजी लोकसभा खासदार आहेत.
केजरीवाल यांची भीती
सध्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले असले तरी केजरीवाल यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी ही निवडणूक निदान आम आदमी पक्षाकरिता आहे. ‘फिर लायेंगे केजरीवाल’, या घोषणेवरून सत्ताधारी पक्ष निवडणूक लढवत आहे. केवळ केजरीवाल हाच त्या पक्षाचा हुकमी एक्का आहे. दिल्लीच्या सध्या असलेल्या मुख्यमंत्री अतीशी तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे केजरीवाल यांचे होयबा मानले जातात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाने केजरीवाल सावध झालेले आहेत. दिल्लीत अशा प्रकारच्या योजनेखाली महिलांना 1,000 रु. दरमहा मिळतात. आपण परत निवडून आलो तर ही रक्कम 2100 रु.करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केलेली आहे. ‘भाई हो तो ऐसा, केजरीवाल जैसा’, अशी घोषणा ‘लाडक्या बहिणी’ करता दिली जात आहे. केजरीवाल यांची भीती निराळीच आहे. भाजप त्यांच्यापेक्षा जास्त आमिष मतदारांना दाखवून आपल्याकडे वळवून घेईल ही त्यांना भीती आहे. याला कारण सर्व तऱ्हेने केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा घेराव भाजपने सुरु केलेला आहे. केजरीवाल यांच्या पक्षाकडे महानगरपालिका येऊन दोन वर्षे होत आली पण स्थानिक पातळीवर तिचे काम बऱ्यापैकी चाललेले आहे असे दिसत नाही.
‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन’ असे काहीसे कात्रीत सापडलेल्या केजरीवाल यांचे झाले आहे. संसदेच्या या अधिवेशनात वादग्रस्त उद्योगपती अदानी यांचा मुद्दा जोरदारपणे उठला होता. त्यात सध्या हात धुवून घेण्याचे काम आम आदमी पक्षाने सुरु केले आहे. दिल्लीच्या जनतेला त्यांनी अदानीचा बागुलबुवा दाखवण्याचे काम सुरु केले आहे. जर भाजप दिल्लीत सत्तेत आली तर पहिले म्हणजे वीजेचे काम सारे अदानीच्या हातात जाईल. त्यामुळे गरिबाला मिळत असलेली महिना 200 युनिट मोफत वीज गायब होईलच पण त्याचबरोबर इतरांकरिता देखील वीज भरमसाठ महाग होईल असा त्यांनी प्रचार चालवला आहे. स्थापनेपासून दहा वर्षात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावलेला आपला एकमेव पक्ष आहे हा केजरीवाल यांचा प्रचार बरोबर असला तरी या पक्षाचा प्राण हा राजधानी दिल्लीतच आहे. येथून तो उखडला गेला तर त्याची इतरत्र डाळ फारशी शिजणार नाही असे मानले जाते. दलित समाजावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त विधानाचा वापर देखील केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने जोरदारपणे प्रचारात सुरु केला आहे.
याला उतारा म्हणून भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते हे झोपडपट्ट्यात जाऊन तिथे रात्रभर राहून तेथील प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासने देत आम आदमी पक्षाची मतपेढी उध्वस्त करण्याचा डाव खेळत आहेत. त्याचबरोबर रिक्षावाले आणि फेरीवाल्यांमधील असलेले केजरीवाल यांचे वजन कमी करण्यासाठी देखील पद्धतशीर प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेस आणि आपमधून भरपूर नेत्यांचा प्रवेश करवल्यामुळे भाजपला उमेदवार निवडीत बऱ्याच अडचणी येत आहेत. 70 जागांसाठी 2000 अर्ज आले असल्याने कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाकारायचं याबाबत श्रेष्ठी पेचात पडले आहेत. भाजपमधील तिकिटांच्या लठ्ठालठीचा केजरीवाल यांना फायदा होईल या भीतीने भाजपचे काम सावकाश सुरु आहे. केजरीवाल यांनी आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार घोषित करून याबाबत भाजपवर मात केली आहे. तर काँग्रेसने वीस एक उमेदवार घोषित केलेले आहेत. राजधानीतील मुस्लिम मतदार कशा प्रकारे मतदान करणार त्यावर निवडणूक फिरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसला देखील या निवडणुकीत महत्त्व आलेले आहे. हा समाज केवळ काँग्रेसकडे आशेने बघत असल्याने काँग्रेसने बऱ्यापैकी सीट्स काढल्या आणि मते घेतली तर केजरीवाल यांचे गणित चुकू शकते असा भाजपचा दावा आहे. भाजपचा वारू सध्या बेफाम दौडत असल्याने ‘अब दिल्ली दूर नहीं’ असे त्याला वाटत आहे तर केजरीवाल निकराने झुंजत भाजपचा हल्ला परतवण्याचा आटापिटा करत आहेत. घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे