दिल्ली दंगल वॉरियर्स उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / ग्रेटर नोएडा
येथे सुरू असलेल्या प्रो लीग कुस्ती स्पर्धेत दिल्ली दंगल वॉरियर्सने प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात पंजाब रॉयल्सचा 5-4 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेत दिल्लीला निर्णायक विजयाची जरुरी होती. कारण प्राथमिक लीग स्पर्धेच्या या वरील लढतीपूर्वी दिल्लीला तांत्रिक गुणांचे गणित टाळावयाचे होते. कारण या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी दिल्लीच्या स्पर्धकांवर चांगलेच दडपण आले होते. दिल्ली दंगल वॉरियर्स आणि पंजाब रॉयल्स यांच्यातील या लढतीमध्ये पुरूषांच्या 74 किलो वजन गटातील लढतीत दिल्ली दंगल वॉरियर्सचा मल्ल तुरेन बेरामोव्हने पंजाब रॉयल्स संघातील 23 वर्षांखालील वयोगटातील आशियाई चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या चंद्रमोहनचा 18-8 असा पराभव केला. त्यामुळे ही लढत 4-4 अशी बरोबरीत राहिली.
या लढतीतील महिलांच्या 62 किलो वजन गटातील पहिल्या सामन्यात पंजाब रॉयल्सच्या अॅना गॉडीनेझने दिल्ली दंगल वॉरियर्सच्या मल्लावर निर्णायक विजय मिळविला. या पराभवामुळे दिल्ली दंगल वॉरियर्सला पुन्हा पुढील फेरीसाठी झगडावे लागले. पंजाब रॉयल्स संघाने या स्पर्धेत यापूर्वीच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. महिलांच्या 76 किलो वजन गटातील लढतीत प्रिया मलिकने अॅनेस्टेसिया अल्पेव्हावर 2-0 असा विजय मिळविला. तर पुरूषांच्या 86 किलो वजन गटामध्ये दिल्लीच्या व्ही. भक्तीयारने पंजाब रॉयल्सच्या संदीप मानचा 20-7 असा पराभव केला.
कर्णधार सुजित कालकलने 65 किलो वजन गटातील लढतीत अनुज कुमारचा 10-1 असा एकतर्फी फडशा पाडला. शुभम कौशिकने दिल्लीची आघाडी वाढविताना चिराग शिखराचा 3-1 असा पराभव केला. पंजाब रॉयल्स संघातील रंजिता जांगराने दिल्ली दंगल वॉरियर्सच्या मल्लाचा 5-1 तसेच गॉडीनेजने दिल्ली दंगल वॉरियर्सच्या मल्लाचा पराभव करत आपल्या संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली. 53 किलो वजन गटातील लढतीत मिनाक्षीने सारिकावर शानदार विजय मिळविला. 125 किलो वजन गटातील लढतीमध्ये रोनकने निर्णायक विजय मिळवित पंजाब रॉयल्सचे आव्हान 5-4 असे संपुष्टात आणले. या सामन्यानंतर दिल्ली दंगल वॉरियर्सने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 24 लढतीतून एकूण 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे तर पंजाबने 23 लढतीतून 6 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे.