दिल्ली मुख्यमंत्र्यांचा बंगला केला रिकामा
सामान बाहेर फेकल्याचा आरोप, नियमांचे पालन न केल्याने कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांचे अधिकृत निवासस्थान प्रशासनाकडून रिकामे करण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे निवासस्थान आतिशी यांच्यासाठी रिकामे केले होते. त्यानंतर नव्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी तेथे वास्तव्यास प्रारंभ गेला. मात्र, निवासस्थानाचा ताबा घेताना त्यांनी नियमांचे पालन न केल्याने प्रशासनाने हे निवासस्थान रिकामे केल्याचे समजते.
निवासस्थान रिकामे करताना आपले सामान बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप आतिशी मार्लेना यांनी केला आहे. हे निवासस्थान भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या तरी मोठ्या नेत्याला देण्याचे कारस्थान दिल्लीच्या उपराज्यपालांनी केल्याचाही आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
तीन अधिकाऱ्यांना नोटीस
मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याच्या संदर्भात दिल्लीच्या तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्ली सरकारने नोटीस काढल्या आहेत. मार्लेना यांनी या निवासस्थानात वास्तव्य करण्यापूर्वी काही अनिवार्य नियमांचे पालन करण्याची आवश्यकता होती. हे खासगी निवासस्थान नसून सरकारी असल्यामुळे सरकारी निवासस्थानाचा ताबा घेण्यापूर्वी त्याची रितसर तपासणी व्हावी लागते. तसेच काही महत्वाच्या नियमांचे पालन करावे लागते. तथापि, मार्लेना यांनी हे निवासस्थान केजरीवाल यांच्याकडून सरळ ताब्यात घेतले. त्यामुळे ही कारवाई करावी लागली, असे स्पष्टीकरण उपराज्यपालांच्या वतीने देण्यात आले आहे. सामान बाहेर फेकल्याच्या आरोपाचाही उपराज्यपालांनी अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
निवासस्थान सील करण्याची मागणी
केजरीवाल यांनी निवासस्थान सोडल्यानंतर ते सील करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली होती. निवासस्थान अन्य मुख्यमंत्र्यांना देण्यापूर्वी त्याची नियमाप्रमाणे तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. तथापि, आतिशी मार्लेना यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करून सरळ निवासस्थानाचा ताबा घेतला, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईचे या पक्षाने स्वागत केले असून हे निवासस्थान कायमचे सील करण्यात यावे आणि ते कोणालाही देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक कामे विभागाचा अधिकार
केजरीवाल यांनी निवासस्थान सोडल्यानंतर त्याचा ताबा नियमाप्रमाणे दिल्लीच्या सार्वजनिक कामे विभागाला (पीडब्ल्यूडी) देण्याची आवश्यकता होती. नंतर नव्या मुख्यमंत्र्यांनी या विभागाकडे रितसर अर्ज करून निवासस्थान आपल्याकडे घ्यावयास हवे होते. तथापि आतिशी मार्लेना यांनी हे नियम न पाळता थेट निवासस्थानात राहण्यास प्रारंभ केला, असे स्पष्टीकरण दिल्लीच्या प्रशासनाने दिले आहे.