For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सचा लखनौला दे धक्का !

06:55 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सचा लखनौला दे धक्का
Advertisement

6 गडी राखून विजय : समीर रिझवीची शानदार नाबाद अर्धशतकी खेळी, एनगिडी, टी. नटराजनचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

येथील एकाना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाने सुरूवात करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा डाव अवघ्या 141 धावांवर आटोपला. यानंतर समीर रिझवीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले.

Advertisement

142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीलाही बॅकफूटवर जावे लागले होते, परंतु समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना फटकेबाजी केली.  रिझवीने 47 चेंडूत नाबाद 70 धावांचे योगदान दिले तर स्टब्सने 32 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 39 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या जोरावर दिल्लीने 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला.

दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल मार्श (35) व अब्दुल समद (36) हे दोघे वगळल्यास लखनौच्या एकाही फलंदाजाला 15 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. कर्णधार रिषभ पंत (7) तिसऱ्या षटकात विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. दिल्लीचा कर्णधार अक्षरने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेत लखनौवर दडपण ठेवले आणि स्टार फलंदाजांची फौज असलेला लखनौचा संघ ढेपाळला. त्यांचा संपूर्ण संघ 141 धावांत ऑलआऊट झाला. दिल्लीच्या लुंगी एनगिडी व टी नटराजन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने दोन बळी टिपले. कर्णधार अक्षर पटेलने 1 बळी टिपताना एडन मार्करमचा त्रिफळा उडवला.

 मोहम्मद शमीचा असाही अनोखा विक्रम

या सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. 142 धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद करून त्याला ‘गोल्डन डक‘ची चव चाखायला लावली. या एका विकेटसह शमीने आयपीएलमध्ये असा पराक्रम केला आहे, जो आजवर ट्रेंट बोल्ट किंवा मलिंगासारख्या दिग्गजांनाही जमला नाही. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची शमीची ही पाचवी वेळ आहे. अशा प्रकारे 5 वेळा पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणारा तो आयपीएलमधील एकमेव गोलंदाज ठरला आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा आणि भुवनेश्वर कुमार (प्रत्येकी 3 वेळा) हे दिग्गज शमीच्या बरेच मागे आहेत. विशेष म्हणजे, शमीने केएल राहुलला दुसऱ्यांदा डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

Advertisement
Tags :

.