दिल्ली कॅपिटल्स चौथ्यांदा अंतिम फेरीत
गुजरातवर 7 गड्यांनी मात, जेमिमा रॉड्रिग्स सामनावीर, हेन्रीचे 3 बळी, बेथ मुनीचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था / बडोदा
लिझेली ली, शेफाली वर्मा, वूलव्हार्ट आणि कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर मंगळवारी येथे झालेल्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्चा 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) यांच्यात अंतिम सामना गुरूवार दि. 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरातने 20 षटकांत 7 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 15.4 षटकांत 3 बाद 169 धावा जमवित हा सामना 26 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी जिंकला.
गुजरात जायंट्सच्या डावामध्ये सलामीच्या बेथ मुनीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 51 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 62 धावा झोडपल्या. वेरहॅमने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 तर अनुष्का शर्माने 13 चेंडूत 2 चौकारांसह 16 आणि के. गौतमने 10 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स गोलंदाजांनी 19 वाईड चेंडू टाकल्याने गुजरात जायंट्सला 25 अवांतर धावा मिळाल्या. दिल्ली कॅपिटल्सतर्फे चिनेली हेन्रीने 35 धावांत 3, नंदिनी शर्माने 44 धावांत 2 तर मिन्नू मणीने 23 धावांत 1 गडी बाद केला. गुजरातच्या डावामध्ये 1 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 48 धावा जमविताना 3 गडी गमविले. मुनीने 47 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. तसेच वेरहॅम आणि मुनी यांनी पाचव्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना शेफाली वर्मा आणि लिझेली ली या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी सुरू केली. या जोडीने 43 चेंडूत 89 धावांची भागिदारी केली. लीने 24 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 43 धावा झळकविल्या. गुजरातच्या वेरहॅमने तिला पायचीत केले. त्यानंतर वेरहॅमने दिल्ली कॅपिटल्सच्या शेफाली वर्माचा त्रिफळा उडविला. तिने 21 चेंडूत 7 चौकारांसह 31 धावा जमविल्या. 8 षटकांत दिल्लीने 2 बाद 92 धावा जमविल्या होत्या.
वूलव्हार्ट आणि कर्णधार रॉड्रिग्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी 41 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. दिल्लीला विजयासाठी 9 धावांची जरुरी असताना रॉड्रिग्स गायकवाडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने 23 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 41 धावा जमविल्या. वूलव्हार्ट आणि कॅप या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. वूलव्हार्टने 24 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 32 तर कॅपने नाबाद 4 धावा जमविल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 3 षटकार आणि 33 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 75 धावा झोडपल्या. गुजराततर्फे वेरहॅमने 2 तर गायकवाडने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकांत 7 बाद 168 (बेथ मुनी नाबाद 62, वेरहॅम 35, अनुष्का शर्मा 16, के. गौतम 18, अवांतर 15, हेन्री 3-35, नंदिनी शर्मा 2-44, मिन्नू मणी 1-23), दिल्ली कॅपिटल्स 15.4 षटकांत 3 बाद 179 (लिझेली ली 43, शेफाली वर्मा 31, वूलव्हार्ट नाबाद 32, रॉड्रिग्स 41, कॅप नाबाद 4, अवांतर 18, वेरहॅम 2-28, गायकवाड 1-33).