दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा विजय
आयपीएल 18 : आरसीबीवर 6 गडी राखून मात : सामनावीर केएल राहुलची नाबाद 93 धावांची खेळी
वृत्तसंस्था/बेंगळूर
केएल राहुलने एकाच षटकात सामना फिरवला आणि दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक विजय मिळवून दिला. गुरुवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 7 गडी गमावत 163 धावा केल्या. यानंतर दिल्लीने केएल राहुलच्या 53 चेंडूत नाबाद 93 धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर 17.5 षटकातच विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग चौथा विजय ठरला तर आरसीबीचा हा पाच सामन्यातील दुसरा पराभव ठरला.
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. फाफ डू प्लेसिसला यश दयालने फक्त 2 धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांना तंबूचा रस्ता दाखवला. फ्रेझरने 6 चेंडूत 7 धावा केल्या. अभिषेक पोरेललाही फक्त 7 धावा करता आल्या. कर्णधार अक्षर पटेलही मोठी खेळी करू शकला नाही.
केएलची धमाकेदार खेळी
30 धावांवर 3 विकेट गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या दिल्लीला केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी उत्तम प्रकारे सावरले. राहुलने मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी केली आणि दिल्लीला पराभवातून बाहेर काढत चांगली फलंदाजी केली. क्रीजवर सेट झाल्यानंतर राहुलने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राहुलने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढे जात त्याने 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, राहुलने 7 चौकार आणि 6 षटकार मारले. स्टब्सने 23 चेंडूत नाबाद 38 धावा करत त्याला चांगली साथ दिली. राहुलने एक शक्तिशाली षटकार मारत दिल्लीला या हंगामात सलग चौथा विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, 15 वे षटक दिल्लीच्या विजयात टर्निंग पॉईट ठरले. आरसीबीचा जोस हेझलवूड हे षटक टाकत होता. या 15 व्या षटकात राहुलने तीन चौकार आणि एका षटकारासह 22 धावांची लूट केली आणि सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
घरच्या मैदानावर आरसीबीला पराभवाचा धक्का
प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. सॉल्टने संघासाठी 17 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या, यामध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार मारले तर विराट कोहली याने 14 चेंडूंमध्ये 22 धावांचे योगदान दिले. त्याने दोन षटकार आणि एक चौकार मारला. मागील सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा देवदत्त पडीकल या सामन्यात विशेष कामगिरी करु शकला नाही. रजत पाटीदार दिल्लीविरुद्ध सामन्यात अपयशी ठरला. त्याला 25 धावा करता आल्या. यानंतर टीम डेव्हिडने अखेरच्या काही षटकात तुफानी खेळी साकारली. त्याने 20 चेंडूत नाबाद 37 धावांची खेळी साकारली. यामुळे आरसीबीला 7 बाद 163 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 20 षटकांत 7 बाद 163 (फिल सॉल्ट 37, विराट कोहली 22, पडिक्कल 1, रजत पाटीदार 25, लिव्हिंगस्टोन 4, जितेश शर्मा 3, कृणाल पंड्या 18, टीम डेव्हिड नाबाद 37, भुवनेश्वर कुमार नाबाद 1, कुलदीप यादव व विपराज निगम प्रत्येकी दोन बळी, मोहित शर्मा व मुकेश कुमार प्रत्येकी एक बळी)
दिल्ली कॅपिटल्स 17.5 षटकांत 4 बाद 169 (डु प्लेसिस 2, मॅकगर्क 7, पोरेल 7, केएल राहुल 53 चेंडूत नाबाद 93, अक्षर पटेल 15, ट्रिस्टन स्टब्ज नाबाद 38, भुवनेश्वर कुमार 2 बळी, यश दयाल व सुयश शर्मा प्रत्येकी एक बळी).