दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विजय
डब्ल्यूपीएल : यूपी वॉरियर्सवर शेवटच्या चेंडूवर मात, अष्टपैलू शेफाली सामनावीर
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
सलग दुसऱ्या सामन्यात लिझेली ली हिने तुफानी फटकेबाजी केल्यानेतर दिल्ली कॅपिटल्सला डब्ल्यूपीएलच्या या मोसमातील पहिला विजय नोंदवण्यात यश आले. दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक ठरलेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर यूपी वॉरियर्सवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. 36 धावा व 16 धावांत 2 बळी मिळविणाऱ्या शेफाली वर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर डेथ ओव्हर्समध्ये डाव कोलमडल्याने यूपी वॉरियर्सला 20 षटकांत 8 बाद 154 धावांची मजल मारता आली. त्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील वॉरियर्सने शेवटच्या पाच षटकांत केवळ 24 धावांची भर सहा बळी गमविले. धावांचा पाठलाग करताना आधीच्या सामन्यात 86 धावांची खेळी केलेल्या लिझेली ली हिने आक्रमक फटकेबाजी केली. शेफाली वर्मासमवेत तिने 11.3 षटकांत 94 धावांची सलामीची भागीदारी केली. तिने 44 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेतर्फे तिने 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. येथील परफॉर्मन्समुळे तिला राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. शेफाली वर्माने 32 चेंडूत 36 धावा जमविल्या. त्यात 6 चौकारांचा समावेश होता.
19 व्या षटकांत कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स 12 चेंडूत जलद 21 धावा जमवित संघाला विजयासमीप आणले. पण ती बाद झाल्यानंतर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत लांबला. सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करीत यूपीला विजयासमीप आणले होते. पण अनुभवी वोल्वार्डने 24 चेंडूत नाबाद 25 धावा जमवित दिल्लीला शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत विजय मिळवून दिला. तीन सामन्यांतील दिल्लीचा हा पहिला विजय आहे. यूपी वॉरियर्सला मात्र अद्यात एकही विजय मिळविता आलेला नाही.
z`
यूपी वॉरियर्सने आपल्या डावात धावगती वाढविण्यासाठी हरलीन देओलला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाने घेतला. पण तिच्या जागी फलंदाजीस आलेली क्लो ट्रायॉन केवळ 3 चेंडू टिकल्याने त्यांचा हा डाव फसला. कर्णधार मेग लॅनिंग (38 चेंडूत 54), फोबे लिचफील्ड (20 चेंडूत 27), हरलीन देओल (36 चेंडूत 47), श्वेता सेहरावत (11 धावा) या चौघींनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. हरलीनने लॅनिंगसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली. दिल्लीच्या मारिझन कॅप व शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 2, नंदिनी शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी यांनी एकेक बळी टिपले. शेफालीने शेवटच्या षटकातच दोन्ही बळी मिळविले. आज गुरुवारी यूपी वॉरियर्स व मुंबई इंडियन्स यांच्यात सायंकाळी 7.30 वाजता याच मैदानावर सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स महिला 20 षटकांत 8 बाद 154 : मेग लॅनिंग 38 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारांसह 54, लिचफील्ड 20 चेंडूत 27, हरलीन देओल 36 चेंडूत 47, श्वेता सेहरावत 12 चेंडूत 11, अवांतर 6. कॅप 2-24, शेफाली वर्मा 2-16, नंदिनी शर्मा 1-29, स्नेह राणा 1-20, श्री चरणी 1-29.
दिल्ली कॅपिटल्स महिला 20 षटकांत 3 बाद 158 : शेफाली वर्मा 32 चेंडूत 36, लिझेली ली 33 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 67, लॉरा वोल्वार्ड 24 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 25, अवांतर 5. दीप्ती शर्मा 2-26, आशा शोभना 1-20.