For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थानला ‘दे धक्का’

06:47 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थानला ‘दे धक्का’
Advertisement

7 गड्यांनी दणदणीत विजय, सामनावीर केएल राहुल, पथुम निसांका यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था, जयपूर

सामनावीर केएल राहुल आणि पथुम निसांका यांची अर्धशतके तसेच स्टार्कच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 7 गड्यांनी आणि पाच चेंडू बाकी ठेवून जिंकला. या सामन्यात कर्णधार रियान परागचे अर्धशतक वाया गेले.

Advertisement

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारच्या या सामन्यात कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या स्पर्धेत आतापर्यंत धडाकेबाज फलंदाजी करणारी सलामीची जोडी केवळ 12 धावांत तंबूत परतल्यानंतर कर्णधार रियान परागचे समयोचित अर्धशतक तसेच डोनोव्हन फरेराच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 बाद 225 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 19.1 षटकांत 3 बाद 226 धावा जमवित विजय नेंदविला.

दिल्ली कॅपिटल्स संघात पहिल्यांदाच सहभागी झालेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर जैस्वालला टिपले. जैस्वालने या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. त्याने केवळ 6 धावा जमविल्या. डावातील दुसऱ्या षटकात राजस्थानचा दुसरा फलंदाज वैभव सूर्यवंशी बाद झाला. जेमिसनच्या यॉर्करवर वैभवचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारांसह 4 धावा केल्या. राजस्थानची यावेळी स्थिती 2 बाद 12 अशी होती.

शतकी भागिदारी

ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान पराग यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 102 धावांची शतकी भागिदारी केली. जुरेलने 30 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42 धावा जमविल्या. अक्षर पटेलने त्याला झेलबाद केले. जुरेल बाद झाल्यानंतर रियान पराग समवेत अष्टपैलू जडेजाने चौथ्या गड्यासाठी 53 धावांची अर्धशतकी भागिदारी केली. जडेजाने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. स्टार्कने आपल्या भेदक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. स्टार्कने रियान परागला बाद करुन आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. परागने 50 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांसह 90 धावा झळकविल्या. त्यानंतर फरेरा आणि दुबे यांनी सहाव्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केल्याने राजस्थानला 225 धावांपर्यंत मजल मारता आली. नटराजनने दुबेला झेलबाद केले. त्याने केवळ 6 धावा जमविल्या. मात्र फरेराने 14 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 47 धावा झोडपल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना निसांका आणि केएल राहुल यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सावध आणि दमदार सुरूवात करुन देताना 57 चेंडूत 110 धावांची शतकी भागिदारी केली. निसांकाने 33 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 62 धावा जमविल्या. जडेजाने ही जोडी फोडताना निसांकाला पायचीत केले. निसांका बाद झाल्यानंतर नितीश राणासमवेत राहुलने दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. नितीश राणाने 17 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 33 धावा जमविल्या. तुषार देशपांडेने त्याला झेलबाद केले. राणा बाद झाल्यानंतर पुढील षटकात केएल राहुल अर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 40 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 75 धावा जमविल्या. स्टब्ज आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. स्टब्जने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 18 तर आशुतोष शर्माने 15 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 25 धावा झळकविल्या.

संक्षिप्त धावफलक राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 225 (रियान पराग 90, डी.फरेरा नाबाद 47, ध्रुव ज्युरेल 42, रविंद्र जडेजा 20, जयस्वाल 6, वैभव सूर्यवंशी 4, अवांतर 9, स्टार्क 3-40, जेमिसन, अक्षर पटेल व नटराजन प्रत्येकी 1 बळी), दिल्ली कॅपिटल्स 19.1 षटकांत 3 बाद 226 (केएल राहुल 75, निशांका 62, नितीश राणा 33, अशुतोष शर्मा नाबाद 25, स्टब्ज नाबाद 18, अवांतर 13, आर्चर, तुषार देशपांडे व रविंद्र जडेजा प्रत्येकी एक बळी)

-आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा राजस्थानचा यशस्वी जैस्वाल बनला पाचवा फलंदाज

-याआधी नमन ओझा (2009, राजस्थान), विराट कोहली (2019, आरसीबी), फिल सॉल्ट (2024, केकेआर), प्रियांश आर्य (2025, पंजाब) यांनी हा पराक्रम केला आहे.

-200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा या मोसमातील 11 वा सामना.

-ई-सिगारेट प्रकरणात दंडाची कारवाई, दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्याने आलेल्या दडपणावर मात करीत रियान परागने या मोसमातील पहिले अर्धशतक नोंदवले.

राजस्थानच्या डावात 14 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. राजस्थानने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 56 धावा जमविताना दोन गडी गमविले. परागने 32 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकविले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे मिचेल स्टार्कने 40 धावांत 3 तर जेमिसन, अक्षर पटेल आणि नटराजन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. राजस्थानने 9 षटकाअखेर 2 बाद 85 धावा जमविल्या होत्या.

दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 11 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 70 धावा जमविल्या. निशांकाने 23 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह तर केएल राहुलने 27 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पुर्ण केले. राजस्थानतर्फे आर्चर, तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :

.