दिल्ली कॅपिटल्स विजयासाठी सज्ज
वृत्तसंस्था/ बडोदा
महिलांच्या टी-20 प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात महत्त्वाचा सामना होणार असून एलिमिनेटरमध्ये स्थान मिळविण्यासाठी या दोन संघात विजयासाठी चुरस राहिल.
रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. या स्पर्धेतील हा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आहे. सदर सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. रविवारच्या सामन्यात विजय मिळविला तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ थेट एलिमिनेटरमध्ये प्रवेश करेल. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात आता चुरस निर्माण झाली आहे. प्राथमिक लीग टप्प्याअखेर तिसऱ्या स्थानासाठी दिल्ली आणि गुजरात जायंट्स यांच्यात चढाओढ सुरु आहे. मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र या स्पर्धेत निराशजणक झाली असून त्यांचे रविवारच्या सामन्यातील निकालानंतर स्पर्धेतील भवितव्य निश्चित होईल. युपी वॉरियर्स संघाने रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळविला तर परिस्थिती वेगळी राहिल. कारण मुंबई, दिल्ली कॅपिटल्स व युपी वॉरियर्स हे प्रत्येकी 6 समान गुणांसह राहतील. त्यानंतर सरस धावसरासरीच्या जोरावर या तीन संघांचे स्थान निश्चित होईल. या स्पर्धेत आरसीबी संघाने अंतिम फेरीतील आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. युपी वॉरियर्सचे नेतृत्व मेग लेनिंग करीत आहे.