For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली स्फोटातील आरोपींच्या कोठडीत वाढ

06:22 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली स्फोटातील आरोपींच्या कोठडीत वाढ
Advertisement

पटियाला हाऊस न्यायालयाकडून दहा दिवसांची एनआयए कोठडी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील लाल किल्ला कार बॉम्बस्फोट आणि कुप्रसिद्ध ‘व्हाइट कॉलर टेररिझम मॉड्यूल’मधील सर्व आरोपींच्या एनआयए रिमांडमध्ये न्यायालयाने आणखी 10 दिवसांची वाढ केली आहे. लाल किल्ल्यावरील ग्रेनेड हल्ल्यातील चार मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनी, डॉ. अदील अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि इरफान अहमद वागे यांच्यासह इतरांना शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची 10 दिवसांची एनआयए रिमांड संपल्यानंतर पुन्हा सर्व आरोपींच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. एनआयएने अधिक चौकशीसाठी रिमांडची मागणी केली होती.

Advertisement

एनआयएच्या पथकाने सर्व संशयितांची कसून चौकशी करत त्यांच्या इतर हस्तकांना पकडण्यासाठी व्यापक तपास सुरू केला आहे. अटकेतील आरोपींकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आता त्यांच्या साथीदारांनाही अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच मॉड्यूलच्या निधी, नियोजन आणि परदेशी संबंधांची चौकशी अधिक तीव्र केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींच्या रिमांडमध्ये वाढ केली. सदर सातही जणांना यापूर्वी 10 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. एनआयए आता मॉड्यूलची ‘व्हाइट कॉलर’ रणनीती, हाय-एंड नेटवर्क आणि स्लीपर सेल कनेक्शन उलगडण्याची तयारी करत आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील चार प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांनी जारी केलेल्या प्रोडक्शन वॉरंटवर या चारही आरोपींना जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आले होते. एजन्सीने गेल्या दहा दिवसांपासून या चारही आरोपींना रिमांडवर ठेवले होते. एनआयएच्या प्राथमिक तपासानुसार या सर्व आरोपींनी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कारनाम्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.