दिल्लीचा मुंबईवर 9 गड्यांनी विजय
कर्णधार लॅनिंगचे नाबाद अर्धशतक, ‘सामनावीर’ जोनासन, मणीचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्णधार मेग लॅनिंगचे नाबाद अर्धशतक तसेच जोनासन आणि मिन्नू मणी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्या मुंबई इंडियन्सचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत गुणतक्त्यात 8 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले.
या स्पर्धेतील हा 13 वा सामना होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 बाद 123 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 14.3 षटकात 1 बाद 124 धावा जमवित 33 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी विजय नोंदविला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 सामन्यातून 8 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून मुंबई इंडियन्सने 5 सामन्यांतून 6 गुणांसह दुसरे तर आरसीबीने तिसरे, युपी वॉरियर्सने चौथे आणि गुजरात जायंट्सने पाचवे स्थान घेतले आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावात मॅथ्युजने 25 चेंडूत 4 चौकारांसह 22, कर्णधार हरमनप्रित कौरने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, भाटियाने 10 चेंडूत 1 षटकार 1 चौकारांसह 11, नॅट सिव्हेर ब्रंटने 22 चेंडूत 2 चौकारांसह 18, अॅमेलिया केरने 18 चेंडूत 2 चौकारांसह 17 आणि अमनजोत कौरने 10 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 17 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 2 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे जोनासनने 25 धावांत 3, मिन्नू मणीने 17 धावांत 3, शिखा पांडे आणि सदरलँड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 35 धावा जमविताना 1 गडी गमविला. मुंबईचे अर्धशतक 55 चेंडूत तर शतक 97 चेंडूत फलकावर लागले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार लॅfिनंग आणि शफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला दणकेबाज सुरुवात करुन देताना 59 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली. शफाली वर्माने 28 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. ती 10 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार लॅनिंग आणि रॉड्रिग्ज यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रॉड्रिग्जने 10 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 15 तर लॅनिंगने 49 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 60 धावा झळकविल्या. दिल्लीच्या डावात 3 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे अमनजोत कौरने 1 गडी बाद केला. दिल्लीने पॉवरप्ले दरच्या 6 षटकात 57 धावा जमविल्या. दिल्लीचे अर्धशतक 32 चेंडूत तर शतक 66 चेंडूत नोंदविले गेले. लॅनिंगने 40 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. संक्षिप्त धावफलक: मुंबई इंडियन्स 20 षटकात 9 गडी बाद 123 (मॅथ्युज 22, हरमनप्रित कौर 22, नॅट सिव्हर ब्रंट 18, अॅमेलिया केर 17, अमनजोत कौर नाबाद 17, भाटिया 11, अवांतर 7, जोनासन 3-25, मणी 3-17, पांडे 1-16, सदरलँड 1-21), दिल्ली कॅपिटल्स 14.3 षटकात 1 बाद 124 (मेग लॅनिंग नाबाद 60, शफाली वर्मा 43, रॉड्रिग्ज नाबाद 15, अवांतर 6, अमनजोत कौर 1-12)