चार नगरसेवकांकडून मिळकतीचा तपशील देण्यास विलंब
कौन्सिल विभागाकडून पाठपुरावा : अहवाल पाठविण्यास होतोय विलंब
बेळगाव : मिळकतीचा तपशील न दिल्याने विजापूर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचे सदस्यत्व बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टन्नावर यांनी रद्द केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेचे नगरसेवक तसेच कौन्सिल विभागाकडून मिळकतीचे तपशील देण्याची सूचना करण्यात आली आहे. 58 नगरसेवकांपैकी 54 नगरसेवकांनी आपल्या मिळकतीची माहिती दिली आहे. मात्र विरोधी गटातील चार नगरसेवकांनी अद्यापही मिळकतीची माहिती कौन्सिल विभागाला दिलेली नाही. आपल्या मिळकतीचा तपशील देण्यास यावर्षी देखील विरोधी गटाच्या नगरसेवकांकडूनच विलंब झाला आहे.
कौन्सिल विभागाकडून संबंधित नगरसेवकांना संपर्क साधून तपशील सादर करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी देखील विरोधी गटाच्या नगरसेवकामुळेच मिळकतीचा तपशील राज्य सरकारकडे पाठविण्यास विलंब झाला होता. यावर्षीही विरोधी गटातील चार नगरसेवकांनी आपला तपशील दिला नसल्याने नगरसेवकांच्या मिळकतीसंबंधीची माहिती राज्य सरकारला पाठविण्यास विलंब झाला आहे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरीस नगरसेवकांना त्यांच्या मिळकतीचा तपशील सादर करावा लागतो. यापूर्वी सदर तपशील केवळ राज्य सरकारकडे पाठविला जात होता. मात्र आता तो राज्याच्या लोकायुक्तांकडेही पाठविला जात आहे.
वेळेत मिळकतीचा तपशील न दिल्याने विजापूरच्या सर्व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
वेळेत मिळकतीचा तपशील न दिल्याने विजापूर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचे सदस्यत्व बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांनी रद्द केले आहे. या कारवाईनंतर जागे झालेल्या बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून नगरसेवकांना मिळकतींचा तपशील देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत 58 पैकी 54 नगरसेवकांनी आपला तपशील दिला आहे. तर 4 नगरसेवकांनी अद्यापही मिळकतीचा तपशील देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून नगरसेवकांना तपशील सादर करण्यास सांगितले जात आहे. मात्र चौघांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने कौन्सिल विभागाकडून तपशील मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.