देहू- आळंदी- पंढरपूर पालखी महामार्ग खचला! अवघ्या दीडच वर्षात खचल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
श्रीपुर / वार्ताहर
केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारा देहू - आळंदी पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास येण्याच्या आधीच, माळशिरस तालुक्यातील तोंडले-बोंडले या ठिकाणी खचला आहे. सध्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी दोनशे मीटर लांब व साठ फुट खोल उरकण्यात आला आहे. यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर एकेरी रस्त्यावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. हा रस्ता खचल्याने संपुर्ण महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज यांच्यासह प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीच्या विठूरायाच्या भेटीसाठी येत असतात. पालखी सोहळ्यातील भावीक व वारकऱ्यांची वाढती संख्या पाहता त्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. सध्या हे पुर्णत्वास येण्याच्या मार्गावर असताना दीडच वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग तोंडले - बोंडले या ठिकाणी खचला आहे. यामुळे या रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्या या रस्त्याचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले असून, याकरीता हा रस्ता दोनशे मीटर लांब व साठ फुट खोल उरकण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विरूद्ध बाजूच्या एकेरी रस्त्यावरून चालू करण्यात आली आहे. परिणामी एकेरी रस्त्यावरून होणारी दोन्ही बाजूंची वाहतूक वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर डायव्हरजन मुळे अपघात देखील झाले आहेत.
तरी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक या महामार्गावरून प्रवास करत आहेत.त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम लवकर व दर्जेदार व्हावे अशी मागणी भाविकांकडून आहे