For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देहाची पालखी

06:52 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
देहाची पालखी
Advertisement

चाकाचा शोध लागला अन् वाहनसृष्टी जन्माला आली. निरनिराळी वेगवान वाहने रस्त्यावर विलक्षण गतीने धावू लागली. प्राचीन काळी माणूस गाढव, खेचर, घोडा, बैल, हत्ती ही सजीव वाहने वापरत होता. आजही कष्टमय वाटेवर, खडतर चढावावर पशुंचेच सहाय्य माणूस घेतो. देवांनी मात्र आपली वाहने बदललेली नाहीत. काळ वेगाने पुढे जात असला तरी देवांच्या वाहनसृष्टीला किंचितही धक्का लागलेला नाही. देवांची वाहने अजूनही प्राणीसृष्टी आहे. आणि त्याची पूजा माणूस आत्मीयतेने करतो आहे. गणपती बाप्पा घरात येतो तेव्हा उंदीर मामा येतो. देवघरात गोमाता, खंडोबाचा घोडा, शिवाचा नंदी श्रद्धेने विराजमान असतो. त्यांची पूजा होते. क्रममुक्तीचा अधिकारी असलेला माणूस अद्याप कोणाचेही वाहन नाही. परंतु देवांच्या पालखीचे भोई होण्याचा मान त्याला शतकानशतके लाभतो आहे, हेही नसे थोडके.

Advertisement

पेशवे काळापर्यंत पालखी हे मानाचे वाहन माणसाला लाभलेले होते. ही पालखी चार किंवा सहा माणसे उचलत असत. आत्ता एखादी मोठी कंपनी ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी गाडी आणि चालक देते त्याप्रमाणे प्राचीन काळी राजे आपल्या अधिकारी, सरदार लोकांना पालखी देत असत. त्यांना पालखी-पदस्थ असे म्हणत. नंतर वेगवान वाहने आली आणि घरगुती समारंभातूनही पालखी हद्दपार झाली. भारतात इंग्रजांचा प्रवेश झाला आणि श्रीमंतांपुरते मर्यादित असलेले हे वाहन माणसांसाठी अंतर्धान पावले.

पालखी फक्त देवालयांमध्ये विशिष्ट उत्सवात निघू लागली. विशिष्ट तिथी, जन्मोत्सवाच्या वेळी फुलांनी, माळांनी सजवलेली देवांची पालखी माणसांच्या हृदयात स्थान मिळवून बसली. तिचा मानसन्मान समाजाच्या मनात कायम राहिला. पालखीचे नुसते दर्शनही माणसासाठी लाखमोलाचे ठरले. पालखी उचलायला मिळणे किंवा पालखीच्या खाली झोपून ती आपल्या शरीरावरून जाणे यासाठी समाज आजही धडपडतो. ते भाग्याचे लक्षण समजतो. आषाढी वारीला निघणारी संतांची पालखी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पालखीबरोबर अनवाणी चालणे आणि नामगजर करत जाणे यात सामावलेल्या आनंदाची तुलनाच होऊ शकत नाही. जिथे मी, तू पणाचा लय होतो त्या वाटेवर पालखीबरोबर चालताना भौतिक संसाराचा विसर पडतो. म्हणून आजही लाखो भक्त पंढरपुरात गर्दी करतात.

Advertisement

संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे- ‘खेळ मांडीयेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।’ विठोबाचे भक्त प्रेमभावाने पंढरीच्या वाळवंटी नामस्मरणात रंगून नाचत आहेत. षडरिपूंचा विसर पडून विठुराया, माऊली, माऊली म्हणत एकमेकांच्या पायी लागत आहेत. महाराज म्हणतात, ‘वर्णाभिमान विसरली याती। एक एका लोटांगणी जाती। निर्मळ चित्ते झाली नवनीते। पाषाणा पाझर सुटती रे।’ भजनात तल्लीन झाल्याने त्यांना देहाचा विसर पडला. त्यामुळे जाती वर्णाचा एरवी मानगुटीवर बसलेला अभिमान कुठल्या कुठे पळून गेला. भवसागर तरून जाण्यासाठी विठोबाने सोपी पायवाट करून दिली. ह्या अनुपम्य पालखी सोहळ्याचे जे साक्षीदार झाले, त्यांच्या देहाची पालखी उजळून गेली.

चौऱ्यांशी लक्ष योनी फिरून मानव देहाची प्राप्ती होते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. मानवी देह मिळाल्यानंतर त्याची योग्यता कळणे, सामर्थ्य अनुभवणे, हे तर खूपच दुर्लभ आहे. त्या परमेश्वराची सतत आठवण राहणे हे तर विरळाच. श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, ‘नित्यनेम नामी तो नर दुर्लभ। लक्ष्मीवल्लभ तयाजवळी।’ आईच्या उदरामध्ये देहाची कलाकुसर, गुंतागुंतीची रचना करणारा तो कोण आहे? संत कबीर म्हणतात, ‘झिनी झिनी बुनी रे चदरिया।’ तो परमात्मा नऊ महिने सलग ही देहाची चादर विणत असतो. त्यात नंतर तो विराजमान होतो, परंतु माणूस जगताना ही चादर मळवून टाकतो. त्यावर डाग पडतात. चुरगळून टाकत तिचे पावित्र्य घालवून टाकतो. कारण त्याला आतल्या परमात्म्याची जाणीवच होत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आत्मा हा सर्वात श्रेष्ठ आहे हे खरे असले तरी देह नसेल तर त्याला जगात स्वत:चे अस्तित्व व सामर्थ्य प्रकट करता येत नाही. माणसाने देहाची किंमत ओळखून त्याचा उपयोग करून घ्यावा. मनुष्य देह ही आत्मदेवाची पालखी आहे. आयुष्यभर देहाची मिरवणूक चालते. देह नाना प्रकारे नटवला, सजवला जातो. देहामधला आत्मा हाच या पालखीचा मुख्य प्राण आहे हे जर ओळखता आले नाही तर जगण्याची किंमत कवडीमोल ठरते.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एक गोष्ट सांगत, एका बाईला विवाहानंतर बऱ्याच वर्षांनी मूल झाले. तिला वाटायचे, आपले मूल सुंदर दिसावे, लोकांना आवडावे म्हणून ती त्याला भारी कपडे घालून सोन्यामोत्यांच्या दागिन्यांनी सजवून चांदीने मढवलेल्या पाळण्यात झोपवीत असे. हे सर्व करताना त्याच्या भुकेची तिला जाणीवच होत नसे. त्याला दूध पाजायचे ती विसरून जाई. त्यामुळे काही दिवसांनी बाळ रोडावले, निस्तेज दिसू लागले. एक दिवस त्या बाईची मोठी बहीण तिच्याकडे आली. बाळाचे असे नुसतेच झकपक संगोपन बघून तिला रागावून म्हणाली, ‘तू हे काय चालवले आहेस? आधी बाळाला पोटभर दूध पाज. त्याला दुधाची आवश्यकता आहे. नटण्या-सजण्याने त्याला त्रास होत असेल.’ ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत की भगवंताला भपकेबाज उत्सवापेक्षा प्रेमाची अपेक्षा असते. खूप मोठा उत्सव केला आणि भगवंताला विसरून गेलो तर काय फायदा? उत्सवाचे फलित काय? आयुष्यभर माणसाच्या देहाचा उत्सव होतो. देहातल्या चैतन्याची पूजा राहून जाते. तो भुकेला राहतो आणि एक दिवस या देहाला सोडून जातो. देहाची रिकामी पालखी लवकर कशी दहन करता येईल याचीच समाजाला चिंता लागते. देह ही परमात्म्याची पालखी आहे आणि सारी इंद्रिये त्याचे भोई आहेत, हे कळायला सुद्धा पुण्याई लागते. कवी प्रवीण दवणे एका गाण्यात म्हणतात, ‘साता जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणुनी जाहलो पालखीचे भोई’ नरदेह पूर्वसंचिताने लाभतो. तो कधी विराम पावेल हे कुणालाच सांगता येत नाही. माणसाचे जीवन ही एक परमेश्वराच्या द्वाराकडे जाणारी यात्रा असायला हवी. जसा प्रारब्धाचा खेळ चालतो त्याप्रमाणे हा देह वारा वाहील तिकडे भरकटतो. त्याला परमार्थाच्या दोरीने बांधून ठेवावे लागते. पालखीचे व्रत असते, असे पूजनीय वासुदेव वामन बापट गुरुजी म्हणत. भौतिक कामनांचा त्याग करून नि:स्वार्थ होऊन पूर्ण शरणांगतीसह जर हे पालखीचे व्रत आयुष्यभर अंगीकारता आले तर आपण ईश्वराला म्हणू शकू की आयुष्यभर पालखीत बसवून तुला खांद्यावर घेतले आहे. आता माझी जीवनयात्रा जेव्हा संपेल तेव्हा स्वर्गनरकामधून वाहणाऱ्या त्या वैतरणा नदीच्या पलीकडे जाण्यासाठी तू मला खांद्यावर घे आणि तुझ्या धामाला पोचव. बापट गुरुजींचा हा संदेश मोलाचा आहे.

देहाशी निगडित असलेला सारा जीवनप्रवास हा या देहात वसलेल्या परमेश्वराची ओळख झाली की पूर्णत्व पावतो आणि देहपालखीमधली ज्योत ही जन्माचे औक्षण करते. हा चिरंजीव क्षण प्रत्येकाला आयुष्यात प्राप्त होवो, ही त्या परमात्म्याला प्रार्थना

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.