‘डेगवे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार’; निष्ठावंत कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब
डेगवे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी सरपंच आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मंगलदास देसाई तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांचे विशेष कौतुक केले.
मंगलदास देसाई हे आमदार दीपक केसरकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आपण भाजपमध्ये असताना त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेला सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते, अशी आठवण संजू परब यांनी सांगितली. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षाला मोठी ताकद मिळते, असेही ते म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापासून तयारी करा
मंगलदास देसाई आणि विजय देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावात संघटनात्मक कामाला सुरुवात करावी. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन परब यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यात शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात असून, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, संजय माणगावकर, संजय गावडे, संजय पालकर, झेवियर फर्नांडिस, सदा कदम, महेश सावंत, रवी परब, विश्वास घाग, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, बंटी पुरोहित, शिल्पा मेस्त्री, महादेव राऊळ आणि वेंगुर्ले येथील शेतकरी आप्पा गावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
