दडपशाही झुगारून मूक सायकल फेरी यशस्वी
बॅरिकेड्स उभारून सहभागी होण्यास मज्जाव : गल्ली-बोळातून वाट काढत कार्यकर्ते फेरीत
प्रतिनिधी/ बेळगाव
काळ्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये उपस्थितांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू होता. शहापूरच्या विविध भागात बॅरिकेड्स लावून अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे लहान गल्ल्यांमधून अथवा मिळेल त्या वाटेने कार्यकर्ते दुचाकी व सायकलवरून फेरीमध्ये सहभागी होत होते. प्रशासनाने खटाटोप करूनदेखील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते फेरीमध्ये सहभागी झाले.
शुक्रवारी लक्ष्मीपूजन असल्याने खरेदीसाठी सकाळपासूनच शहापूर, खडेबाजार परिसरात गर्दी होती. तरीदेखील नाथ पै सर्कल, बँक ऑफ इंडिया कॉर्नर, सराफ गल्ली, महात्मा फुले रोड या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्यात आला होता. वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ येथील कार्यकर्ते फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी शहापूर परिसरात येत होते. परंतु, बॅरिकेड्स लावून रस्तेच बंद करण्यात आल्याने त्यांना सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे लहान गल्ल्यांमधून वाट काढत वाहनचालक मुख्य मिरवणुकीत सहभागी होत होते.
प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. हातात झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनाही मिरवणुकीत सहभागी होण्यापासून मज्जाव करण्यात येत होता. एकूणच फेरी यशस्वी होऊ नये, यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू होता.
फेरीच्या मार्गात कपात केल्याने नाराजी
सायकल फेरी शहापूरच्या विविध भागात यापूर्वी काढली जात होती. परंतु, शुक्रवारी अचानक मार्गात बदल करत कपातही करण्यात आली. बिच्चू गल्ली, तसेच परिसरात यावर्षी फेरी काढण्यास परवानगी दिली नाही. बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून काकेरू चौक परिसरातही फेरी बंद करण्यात आली आहे. दरवर्षी मार्गात प्रशासनाकडून कपात केली जात असल्याने म. ए. समितीकडून संताप व्यक्त करण्यात आला.