जर्मनी दौऱ्यावर जाणार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर होणार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे 21-23 एप्रिलपर्यंत जर्मनीच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत-जर्मनी संरक्षण सहकार्याला नवा आयाम मिळण्याची अपेक्षा आहे. राजनाथ सिंह हे जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. बैठकीत संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविणे, दोन्ही देशांच्या सैन्यसंबंधांना मजबूत करणे, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, ड्रोन तसेच अन्य उभरत्या क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या संधींवर विस्तृत चर्चा होणार आहे.
दौऱ्यादरम्यान संरक्षण औद्योगिक सहकार्याच्या रोडमॅपवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघ शांतता अभियानांमध्ये प्रशिक्षण सहकार्याशी निगडित करारांवरही स्वाक्षरी होऊ शकते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे जर्मन संरक्षण उद्योगक्षेत्राच्या प्रमुख प्रतिनिधींची भेट घेऊ शकतात, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत संयुक्त विकास आणि उत्पादनाला यामुळे बळ मिळू शकते. या दौऱ्यात म्युनिचमध्ये एक विशेष संरक्षण गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन प्रस्तावित असून ज्यात भारत आणि जर्मनीच्या आघाडीच्या शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्या भाग घेणार आहेत.
प्रोजेक्ट 75आय
चर्चेतील प्रमुख मुद्दा प्रोजेक्ट 75आय अंतर्गत जर्मनीची कंपनी थिसेनक्रूप मरीन सिस्टीम्ससोबत 6 अत्याधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या निर्मितीचा करारही असू शकतो. या कराराचे मूल्य 8 अब्ज डॉलर्स असल्याचे सागण्यात येत आहे. हा दौरा भारत-जर्मनी संरक्षण संबंधांमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जर्मनी आता भारताला आधुनिक सैन्य तंत्रज्ञान, खासकरून पाणबुडी निर्मिती, हवाई सुरक्षा प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञानात भागीदारासाठी महत्त्वपूर्ण भागीदार मानत आहे.