For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जर्मनीच्या दौऱ्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

06:55 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
जर्मनीच्या दौऱ्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Advertisement

अत्याधुनिक पाणबुडीकरता करार शक्य : एआय-ड्रोन तंत्रज्ञानासंबंधी होणार चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगळवारी जर्मनीत पोहोचले असून तेथे त्यांचे स्वागत भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी केले आहे. राजनाथ सिंह यांचा हा दौरा भारत-जर्मनी संरक्षण सहकार्याला वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असून यात औद्योगिक सहकार्य, सैन्यसंबंध आणि सायबर, एआय तसेच ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. स्वत:च्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस आणि तेथील सरकारच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतील.

Advertisement

या चर्चांचा केंद्रबिंदू संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविणे सैन्यसंबंधांचा विस्तार करणे आणि सायबर सुरक्षा, एआय तसेच ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये नव्या संधींचा शोध घेणे असेल. या दौऱ्यादरम्यान दोन्ही संरक्षणमंत्र्यांच्या उपसिथतीत संरक्षण औद्योगिक सहकार्य रोडमॅप आणि संयुक्त राष्ट्रसंघ शांतता अभियानांच्या प्रशिक्षणात सहकार्यासाठी एक अंमलबजावणी व्यवस्था करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

संरक्षण उपकरणांचा संयुक्त विकास आणि सह-उत्पादनाला चालना देण्यासाठी हे करार महत्त्वपूर्ण असणार आहेत. तसेच संरक्षण सहकार्याच्या पुढाकारांची समीक्षा करणे आणि दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांदरम्यान सहकार्याचे नवे मार्ग शोधण्यासाठी हा दौरा एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करणार आहे.

मेक इन इंडियावर जोर

राजनाथ सिंह यांच्याकडून भारताच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराच्या अनुरुप संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान भागीदारी आणि सह-उत्पादन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी जर्मन संरक्षण उद्योगाच्या प्रमुख प्रतिनिधींसोबत चर्चा केली जाणार आहे. मागील 7 वर्षांमध्ये कुठल्याही भारतीय संरक्षणमंत्र्यांकडून होणारा हा जर्मनीचा पहिलाच दौरा आहे. हा दौरा वर्तमान काळात या सहकार्याच्या महत्त्वाला अधोरेखित करतो.

दौरा खास का?

यापूर्वी भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केला होता. जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी जून 2023 मध्ये भारताचा दौरा केला होता. भारत अन् जर्मनी या देशांदरम्यान एक मजबूत अन् बहुआयामी रणनीतिक भागीदारी आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये संरक्षण अन् सुरक्षा सहकार्य महत्त्वपूर्ण स्तंभ ठरला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या दौऱ्यात अत्याधुनिक पाणबुडी निर्मितीसाठी करार होण्याची शक्यता आहे.

संरक्षण करारावर नजर

राजनाथ सिंह यांच्या या दौऱ्यादरम्यान 75आय (पी-75आय) अंतर्गत भारतात पुढील पिढीच्या 6 पारंपरिक पाणबुडी निर्माण करण्याच्या प्रस्तावित भारत-जर्मनी करारावर चर्चा होणार आहे. भारत आणि जर्मनी दीर्घकाळापासून या पाणबुडी कराराला अंतिम रुप देण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतासाठी महत्त्वाचा ‘प्रोजेक्ट-75आय

-प्रोजेक्ट 75आय अंतर्गत 6 पाणबुडी निर्मितीसाठी भारताकडून 70 हजार कोटी रुपयांपासून 99 हजार कोटी रुपयांपर्यंतचा करार केला जाऊ शकतो.

-जर्मनीच्या कंपनीच्या मदतीने या 6 पाणबुड्या मुंबईतील मझगाव डॉकयार्ड्स लिमिटेडकडून भारतातच निर्माण केल्या जाऊ शकतात.

-जर्मनीची प्रमुख संरक्षण कंपनी ‘थिसेनक्रूप मरीन सिस्टीम्स’ या प्रकल्पाकरता भारतीय कंपनीला सहकार्य करत तांत्रिक भागीदार म्हणून भूमिका बजावेल.

-या 6 पाणबुड्या ‘एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन’ (एआयपी) प्रणालीने युक्त असतील, ज्यामुळे पाणबुडी अनेक आठवडे पाण्याखाली राहण्यास सक्षम असेल.

-दोन्ही देशांदरम्यान एक आंतर-सरकारी करार होणार आहे, जो या मोठ्या करारासाठी एका व्यापक व्यवस्थेचे काम करणार आहे.

-पाणबुड्यांची निर्मिती मझगाव डॉकयार्ड्स लिमिटेकडून केली जाईल, ज्यात 50 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.