पुतीन दौऱ्यात संरक्षण सामग्री करार शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा प्रारंभ 4 डिसेंबरला होत आहे. दोन्ही देशांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असून त्यात महत्त्वाचे संरक्षण सामग्री खरेदी करार होण्याची शक्यता आहे. रशियाची अत्याधुनिक पाचव्या पिढीतील सुखोई एसयु 57 युद्धविमाने आणि एस-400 ही क्षेपणास्त्रे आणि विमानविरोधी यंत्रणा खरेदी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या चर्चेत दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्याचा पाया अधिक भक्कम केला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या अस्थिर आणि झपाट्याने परिवतर्तीत होणाऱ्या जागतिक स्थितीत भारत आणि रशिया यांची मैत्री अधिकच महत्त्वाची ठरणार आहे. गेली सात दशके दोन्ही देश एकमेकांशी घनिष्ट सहकार्य करीत आहेत. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत रशियन बनावटीच्या युद्ध सामग्रीचा महत्त्वाचा वाटा आहे. विशेषत: भारताच्या वायुदलात रशियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेल्या विमानांची मोठी संख्या आहे. रशियाचे सुखोई एसयु 57 हे जगातील पाचव्या पिढीतील सर्वात आधुनिक आणि प्रभावी विमान मानण्यात येते. त्यामुळे भारत या विमानांच्या खरेदीसाठी, तसेच भारतात त्यांचे उत्पादन करण्याविषयी उत्सुक आहे.
पेसोव्ह यांचे विधान
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसोव्ह यांनी पुतीन यांच्या भारत दौऱ्यासंबंधी माहिती दिली. रशियाकडूनही या दौऱ्याची जोरदार सज्जता करण्यात आली आहे. सुखोई एसयु 57 हे जगातील सर्वोत्तम विमान आहे. या विमानासंबंधी भारताशी निश्चितपणे चर्चा होणार आहे. तथापि, यासंबंधी अधिक माहिती दिली जाणार नाही. कारण, युद्ध विमानांच्या संदर्भात स्पर्धा मोठी आहे. तथापि, या विमानाशी कोणीही स्पर्धा करू शकणार नाही, याची शाश्वती आहे. भारताशी या संदर्भात काय चर्चा होते, ते सध्यातरी गुप्त ठेवले जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
संयुक्त उत्पादनाचे संकेत
सुखोई एसयु 57 या विमानाचे संयुक्तरित्या उत्पादन करण्याचे संकेत पेसोव्ह यांनी दिले. या विमानाचे तंत्रज्ञान काही प्रमाणात भारताला दिले जाऊ शकते. जितके शक्य आहे, तितके भारताला देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तथापि, काही बाबी गुप्त ठेवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आताच या विषयावर अधिक वाच्यता करणे योग्य ठरणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.