For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेशी 7,995 कोटींचा संरक्षण करार

06:49 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेशी 7 995 कोटींचा संरक्षण करार
Advertisement

नौदल आणखी मजबूत होणार : ‘टॅरिफ वॉर’दरम्यान भारताचा मोठा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या आठवड्यात भारत भेटीवर येत असतानाच भारताने अमेरिकेसोबत एक मोठा करार केला आहे. भारताने त्यांच्या नौदलाच्या 24 सी-हॉक हेलिकॉप्टरच्या ताफ्यासाठी पाच वर्षांच्या ‘फॉलो-ऑन सपोर्ट’ पॅकेजचा भाग म्हणून अमेरिकेसोबत सुमारे 7,995 कोटी रुपयांचा करार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतीय वस्तूंवर एकूण 50 टक्के कर लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना भारत आणि अमेरिकेतील हा करार झाला आहे.

Advertisement

संरक्षण मंत्रालयाने जवळपास 8,000 कोटी रुपयांच्या ‘एमएच60आर’ हेलिकॉप्टर ताफ्यासाठी अमेरिकेसोबत लेटर ऑफ ऑफर अँड अॅक्सेप्टन्सवर (एलओए) स्वाक्षरी केली आहे. लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनने बनवलेले हे हेलिकॉप्टर सर्व हवामानात वापरता येतील असे हेलिकॉप्टर आहेत. भारताने फेब्रुवारी 2020 मध्ये 24 ‘एमएच60आर’ खरेदीसाठी अमेरिकेसोबत करार केला होता. त्याचाच पुढील टप्प्याला आता मंजुरी देण्यात आली असून संबंधित उत्पादनांचा पुरवठा 2030 पर्यंत सुरू राहणार आहे.

2021 मध्ये पहिली तुकडी प्राप्त

संरक्षण मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, ‘फॉलो-ऑन सपोर्ट’ हा एक व्यापक पॅकेज असून त्यामध्ये सुटे भाग, अॅक्सेसरीज, उत्पादन समर्थन, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य आणि दुरुस्ती भागांसह विस्तृत तरतुदींचा समावेश आहे. या सुविधांमुळे देशात दीर्घकालीन क्षमता निर्माण होईल आणि अमेरिकन सरकारवरील अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे. भारताला 2021 मध्ये पहिले तीन ‘एमएच60आर’ हेलिकॉप्टर मिळाले होते.

नौदलाला नवे बळ मिळणार

हा करार एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) आणि इतर भारतीय कंपन्यांद्वारे स्वदेशी उत्पादने आणि सेवांच्या विकासाला देखील प्रोत्साहन देईल. याव्यतिरिक्त शाश्वत समर्थनामुळे ‘एमएच60आर’ हेलिकॉप्टरची ऑपरेशनल उपलब्धता आणि देखभाल लक्षणीयरीत्या सुधारेल. ‘एमएच60आर’ सीहॉक हे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरचे सागरी रूप आहे. या हेलिकॉप्टर्समध्ये पाणबुडीविरोधी युद्धक्षमता देखील असल्यामुळे नौदलाची क्षमता आणखी भक्कम होणार आहे.

Advertisement
Tags :

.