भूतानला एकतर्फी नमवित भारत अंतिम फेरीत
भारताचा भूतानवर 5-0 फरकाने विजय : बांगलादेशविरुद्ध होणार जेतेपदाची लढत
वृत्तसंस्था, माले (मालदिव)
भारताने मालदिवमधील माले येथील नॅशनल स्टेडियमवर भूतानचा 5-0 ने दणदणीत पराभव करत सॅफ यू-20 चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एआयएफएफच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, गतविजेत्या भारतीय संघाने वेग, अचूकता आणि आक्रमक गोलसमाप्ती यांनी परिपूर्ण असा जबरदस्त खेळ केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशने नेपाळचा 1-0 ने पराभव केल्यानंतर आता 3 एप्रिल रोजी भारताची अंतिम लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
रोहेन सिंग चापामयुम हा या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने 56 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल केले आणि भारताच्या आक्रमक खेळांत महत्त्वाची भूमिका बजावली. उर्वरित गोल ओमांग डोडुम (4), मोहम्मद अरबाश (44) आणि बदली खेळाडू मालेमंगंबा थोकचोम (90+2) यांनी केले.
भारताने सामन्याच्या सुरूवातीलाच खेळावर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि एका सुरेख चालीद्वारे चौथ्या मिनिटालाच आघाडी घेतली. बुंगसन सिंग ताखेलंबमने उजव्या बाजूने एक लांब पास दिला. जो रोहेनने ताब्यात घेतला आणि कडेने वेगाने धाव घेतली. त्याने पेनल्टी क्षेत्रात दिलेल्या जमिनीलगतच्या पासवर ओमांग डोडुमने भूतानच्या दोन बचावपटूंच्या मधून सरकत गोलपोस्टच्या जवळून अत्यंत सफाईदारपणे गोल केला. यातून त्याने एका चपळ शिकाऱ्याची वृत्ती दर्शविली.
सुरूवातीलाच मिळालेल्या या यशामुळे भारताला सामन्याचा वेग आणि लय आपल्या मनाप्रमाणे ठरवता आली. त्यांनी चेंडूचा ताबा कायम राखला आणि भूतानच्या बचावफळीवर सतत दबाव निर्माण केला. सहाव्या मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जेंव्हा विशाल यादवने मारलेला चेंडू अनपेक्षितपणे दिशा बदलून गोलच्या अगदी जवळून गेला. रोहेन आणि डोडुम यांनी केलेल्या गोलच्या प्रयत्नांमुळे भूतानचा गोलरक्षक तांदिन पेनजोर याची सतत कसोटी लागत होती आणि त्यांच्यावर दबाव कायम होता.
37 व्या मिनिटाला भारत पुन्हा एकदा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. जेंव्हा याइफारेम्बा चिंगाखामने पेनल्टी क्षेत्रात ऋषिकान्त मेईतेई लैश्रामसाठी एक अचूक पास दिला, परंतु त्याचा फटका सोमन दोरजीने अडवला. यानंतर काही क्षणांतच सामन्याच्या प्रवाहाच्या अगदी विरुद्ध भूतानला गोल करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली. रोहेनने दिलेल्या एका चुकीच्या पासमुळे न्गावांग योंतेनला मध्यवर्तुळाजवळ चेंडूचा ताबा मिळाला. गोलरक्षक सूरज सिंग अहेइबम हा आपल्या गोलरेषेपासून थोडा पुढे आला आहे हे पाहून योंतेनने लांब अंतरावून लोब मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू गोलपोस्टच्या आडव्या दांडीवर आदळला. ज्यामुळे सूरजला सावरण्याची आणि चेंडू ताब्यात घेण्याची संधी मिळाली. मध्यंतराच्या अगदी आधी 44 व्या मिनिटाला भारताने आपली आघाडी वाढविली. डोडुमने पुढे झेप घेतली आणि गोलच्या तोंडावर एक चेंडू मारला. जो भूतानच्या बचावफळीला चुकवून गेला. अर्बाशने योग्य वेळी धाव घेतली आणि दूरच्या पोस्टवर चेंडू गोलजळयात ढकला. ज्यामुळे मध्यंतरापर्यंत भारतला 2-0 अशी आरामदायी आघाडी मिळाली.
दुसऱ्या सत्राची सुरूवात भारताच्या आक्रमक खेळाने झाली. काही मिनिटांतच त्यांनी सामना जवळजवळ निश्चित केला. 56 व्या मिनिटाला एका सुरेख सांघिक चालीमुळे तिसरा गोल झाला. डोडुमने डाव्या बाजुने चेंडू पुढे नेला आणि अर्बाशला पास दिला. ज्याने तो रोहेनकडे सोपवला. ज्याने जोरदार फटका मारुन चेंडू जाळ्यात टाकला. अवघ्या एका मिनिटानंतर भूतानच्या ढिसाळ पासिंगमुळे अर्बाशला पुन्हा चेंडूचा ताबा मिळाला. त्याने पुढे झेप घेतली आणि पुन्हा रोहेनला पास दिला. ज्याने शांतपणे आपला दुसरा गोल पूर्ण केला. भारताने उर्वरित सामन्यावर शांतपणे नियंत्रण ठेवले. भूतानला तुरळक हल्ल्यांपुरते मर्यादित ठेवले आणि स्वत: प्रतिहल्लातून धोका निर्माण करणे सुरू ठेवले. स्टॉपेज टाईममध्ये अंतिम विजय पहायला मिळाला. जेंव्हा मलेमंगाम्बा थोकचोमने डाव्या बाजुला चेंडू स्वीकारुन एका कोपऱ्यातून डाव्या पायाने शॉट मारला आणि 5-0 असा एकतर्फी विजय पूर्ण केला.