दडपशाही झुगारली, अस्मिता जपली
काळादिन मूक सायकल फेरीत हजारो सीमाबांधव सहभागी : महाराष्ट्रात जाण्याचा वज्र निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने’
या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्तीचे प्रत्यंतर देत सीमावासियांनी 1 नोव्हेंबरचा काळादिन यशस्वी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सीमावासियांनी मूक सायकल फेरीत सहभागी होत झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त केला. मराठी अस्मितेचे दर्शन घडवत हजारो सीमाबांधव फेरीमध्ये सहभागी झाले होते.
एकीकडे राज्योत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र धुडगूस सुरू असताना सीमावासीय मराठी भाषिकांनी मात्र शांततेच्या मार्गाने मूक फेरी काढून यशस्वी केली. आज 68 वर्षे उलटली तरी सीमाप्रश्नाची धग कायम आहे. जणू हे व्रतच आम्ही स्वीकारले असून त्याचे दाहक चटके आमच्या मनातील मराठीपण व मराठी अस्मितेला नमवू शकणार नाहीत, असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला.
सकाळी 9.30 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरीला सुरुवात झाली. दिवाळी असल्याने सकाळी मोजकेच कार्यकर्ते संभाजी उद्यान परिसरात उपस्थित होते. कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक होती. त्यामुळे निषेध फेरीला गर्दी होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु, जसजशी फेरी पुढे पुढे सरकत गेली, तसतसे सीमाबांधव फेरीमध्ये सहभागी होत गेले. भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, शनिमंदिर परिसरातून गर्दी वाढत गेली.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी दिवशी फेरी यशस्वी होईल की नाही, असा विचार म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. परंतु, दिवाळी असली तरी महाराष्ट्रात जाण्याची दृढ इच्छा सीमावासियांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. यावर्षीही तरुणाईचा उत्साह अधिक दिसून आला. अनेक कार्यकर्ते चालत फेरीमध्ये सहभागी झाले होते. तर काही कार्यकर्त्यांनी सायकल व दुचाकी घेऊन सहभाग दर्शविला. काळे कपडे, काळ्या टोप्या, काळे फेटे, दंडावर काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
म. ए. समितीने कोणत्याही घोषणा न देण्याचे आवाहन केले होते. परंतु, सीमावासियांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत जोरदार घोषणा दिल्या. ‘बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में’, ‘नाही नाही कधीच नाही, कर्नाटकात राहणार नाही’, ‘बघताय काय सामील व्हा’ अशा घोषणांनी युवापिढीमध्ये स्फूर्ती वाढविली जात होती. बेळगाव शहरासह तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहापूर भागात गर्दीचा उच्चांक
सुरुवातीला तुरळक असलेली गर्दी शहापूर भागातून वाढत गेली. खडेबाजार शहापूर येथे गर्दीने उच्चांक गाठला. गर्दी वाढत गेल्याने पोलिसांनाही जादा कुमक मागवावी लागली. महिलांचाही समावेश लक्षणीय ठरला. विशेष म्हणजे लहान मुले हातामध्ये काळे झेंडे घेऊन आम्ही या लढ्याचे पुढचे वारसदार असू, हे दाखवून दिले. या फेरीमध्ये शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.
लक्षवेधी फलक
सायकल फेरीवेळी तरुणाईने आणलेले फलक लक्षवेधी ठरले. एक तरुण हातामध्ये फलक घेऊन फेरीत सहभागी झाला होता. ‘बेळगावमधील मराठी पाट्या बदलल्या गेल्या, मराठी होर्डिंग्ज बदलले गेले, परंतु मराठी माणसाच्या हृदयातील मराठीपणाचा बाणा कधीच पुसला जाणार नाही’ असा फलक घेऊन दुचाकीवरून एक तरुण फिरत होता. त्याचबरोबर गोवावेसचा राजा मंडळाच्यावतीने लक्षवेधी फलक तयार करण्यात आला होता. ‘जातीने मराठे आम्ही, सळसळते आमचे रक्त, ध्यास आमचा सोडविणे बेळगाव सीमाप्रश्न फक्त’ यासह ‘गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा’, ‘बेळगावी नव्हे बेळगावच’ असे फलक प्रबोधन करणारे ठरले.
म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
प्रशासनाची परवानगी नसताना मूक सायकल फेरी काढली म्हणून म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले. मार्केट पोलीस स्थानकामध्ये 45 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती उपलब्ध झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.