आता पराभव परवडणारा नाही!
या टी-20 विश्वचषकाने तर कमालच केली. नेमके आराखडे तरी काय बांधायचे. बऱ्याच जणांना बुचकळ्यात किंवा संभ्रमात टाकणारा हा टी-20 विश्वचषक. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बांगलादेश, पाकिस्तानची रडारडी, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि भारत यापैकी दोन देश अंतिम फेरीत पोहोचतील असा अंदाज. परंतु त्यानंतर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा शेवटचा ‘जय भारत’ म्हणत स्पर्धेतील साखळी फेरीतील एक्झिट. त्यानंतर भारत नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार, या आशेने तमाम भारतीयांनी सुपरएटच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आफ्रिकेकडे केलेली मदतीची याचना. हे सर्व कसं एखाद्या चित्रपटाची पटकथा लिहिल्याप्रमाणे टी-20 विश्वचषकाचा सिनेमा. अर्थात या सिनेमाचा क्लायमॅक्स कसा असेल याची मात्र उत्सुकता तमाम क्रिकेट रसिकांना लागून राहिली आहे. थोडक्यात काय तर ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गीत म्हणण्याची पाळी कोणा कोणावर येते हे आपल्याला पाच-सहा दिवसात समजलेच. असो.
कालचा सामना बघून काही चित्रपटातील नायकाचा जो संवाद असतो तो ‘आज तो मैं बहुत खुश हूं’ हेच सर्वजण मनोमनी म्हणत असतील. दोन दिवसापूर्वी म्हटलं होतं की ‘हार ना मना है’. पण ते भारतीय संघासाठी होतं, झिम्बाब्वेसाठी नव्हतं. भारतीय संघ खरोखर त्या वाक्याला जागला. प्रचंड क्षमता असलेला भारतीय संघ, ‘त्या’ क्षमतेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. भारतीय संघाने दोन दिवसांसाठी का होईना, सुटकेचा निश्वास टाकला. काल प्रत्येक फलंदाजाने एक रंग निवडला आणि त्या रंगात ते न्हावून निघाले. या सर्व विजयाच्या जडणघडणीच्या आधी आपल्याला दक्षिण आफ्रिकेला ‘थँक्यू व्हेरी मच‘ म्हटलं पाहिजे. अन्यथा आपण कृतघ्न ठरू. त्यांच्या त्या निर्विवाद विजयामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातील धावगतीचा ईएमआय आपल्याला माफ झाला. आफ्रिकेचा तो विजय आपल्यासाठी वेकअप कॉल होता.
भारतीय फलंदाजांनी धुरळा उडवला की राडा केला, या वादात मी पडणार नाही. परंतु भारतीय गोलंदाज मात्र काठावर पास झाले हे सत्य मात्र नाकारून चालणार नाही. सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या हातात चेंडू देऊन जो विजय आपला शंभर किंवा 110 धावांचा होता तो 70 ते 75 वर आणला. पहिल्या षटकात 26 धावा दिल्यानंतर परत दुसरं षटकही तो टाकतोय त्यामागील लॉजिक समजलं नाही. अर्शदीप आणि बुमराहकडून कोट्यातील सर्व षटकं टाकून थोडा सराव करणं गरजेचं होतं. कारण रविवारचा हा सामना विंडीजविरुद्ध आहे. आजच्या घडीला मला तर वाटतं की टी-20 मधील एक सर्वोत्तम संघ म्हणून बघितलं जातं. बेडर, बिनधास्त अशी विशेषणं ही फक्त त्यांच्याच फलंदाजांना लागू होतात. 7 बाद 77 वरून 8 बाद 177 हे त्याचे उत्तम उदाहरण. बरं, हे फक्त विंडीजच करू शकतो. भले त्यांचा आफ्रिकेविरुद्ध पराभव झालाही असेल. विंडीजच्या संघातील फलंदाज गोलंदाजांची गुलामी करणं आणि त्यांच्या मागे ‘जी जी रे जी जी’ करणं हे त्यांना कदापि मान्य नाही. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या सामन्यात सर्व शस्त्रास्त्रs बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांचे ऐनवेळी फुटणारे बॉम्ब भारतीय संघाला कधी नेस्तनाबूत करतील ते सांगणे थोडे कठीणच. प्रचंड दारुसाठ्याने भरलेला हा विंडीजचा संघ. त्याला ऐनवेळी निकामी करणे गरजेचे आहे, एवढं मात्र खरं!