हरियाणात पराभव, राहुल गांधींना झटका
हरियाणात वातावरण स्वत:च्या बाजूने असूनही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला राज्यात केवळ 37 जागा जिंकता आल्या आहेत.हरियाणातील हा पराभव काँग्रेससाठी मोठा झटका ठरला आहे. या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या रणनीतिवर प्रश्न उपस्थित होणार आहेत. याचा प्रभाव आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीवरही पडणार आहे.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणात निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी पूर्ण जोर लावला होता. आता लवकरच महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. हरियाणाच्या निकालाचा प्रभाव हा महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकींवरही पडू शकतो.
हरियाणात यावेळी विजय होणार असल्याचा दावा राहुल गांधी करत होते. 10 वर्षांच्या भाजपच्या शासनानंतर राज्यात सत्तांतर होईल असे मानले जात होते. परंतु भाजपने सलग तिसऱ्यांदा यश मिळवित राहुल गांधी यांच्या आकांक्षांना धक्का दिला आहे. हरियाणात अनुकूल राजकीय वातावरण असूनही पराभव झाल्याने काँग्रेस नेतृत्व निश्चितच चिंतेत पडणार आहे. लवकरच महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेसला भाजपचे तीव्र आव्हान पेलावे लागणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप शक्ती पणाला लावणार हे निश्चित. हरियाणातील विजयानंतर भाजप नेतृत्व या दोन्ही राज्यांमध्ये अधिक जोरदारपणे प्रचार राबविणार असल्याचे मानले जात आहे. आगामी झारखंड निवडणुकीत भाजपला विजयाची अधिक संधी आहे.
हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये हिंदूंवर झालेले हल्ले, लव्ह जिहादची प्रकरणे, आदिवासी गावात बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याने झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार अडचणीत आले आहे. याचमुळे भाजपने या निवडणुकीवरून आतापासूनच हे मुद्दे उपस्थित करत स्वत:ची पूर्ण शक्ती पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार झारखंडचा दौरा करत आहेत. तर राज्यात काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब असल्याचे चित्र आहे.