हरियाणातील पराभव अनाकलनीय !
राहुल गांधींची प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची काँग्रेसची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर येथील विधानसभा निवडणुकांच्या परिणामांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच बुधवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमधला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीचा विजय हा भारताच्या राज्यघटनेचा विजय आहे. मात्र, हरियाणात झालेला काँग्रेसचा पराभव अनाकलनीय आहे. या पराभवाचे आम्ही विश्लेषण करणार आहोत. आमच्याकडे कार्यकर्त्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे आक्षेप नोंदविणार आहोत, असे गांधी यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो. तेथील आमचा विजय हा घटनेचा विजय आहे. हा लोकशाहीचा आणि आत्मसन्मानाचा विजय आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या अधिकारांसाठी आम्ही यापुढेही संघर्ष करीत राहू. या प्रदेशातील आमच्या शूर कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो, अशा शब्दांमध्ये त्यांनी युतीच्या विजयाची भलावण केली. मात्र, हरियाणातील पराभवासंबंधी शंका उपस्थित करताना नकारात्मक सूर लावला. मतदान यंत्रांवर त्यांनी अप्रत्यक्ष शरसंधान केले.
भाजपने उडविली खिल्ली
राहुल गांधींनी मतदान यंत्रे आणि निवडणूक आयोग यांच्याविषयी उपस्थित केलेल्या शंकांची खिल्ली भारतीय जनता पक्षाने उडविली आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जयवीर शेरगिल यांनी गांधींचे आरोप बालिश असल्याची टीका केली. नापास झालेला विद्यार्थी नेहमी आपले शिक्षक आणि परीक्षेतील प्रश्नपत्रिका यांच्यावर आपल्या अपयशाचे खापर फोडतो. पण तो स्वत: अभ्यास करायला तयार नसतो, अशी राहुल गांधींची स्थिती आहे, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली. गांधी यांनी आता मतदान यंत्रे आणि निवडणूक आयोग यांच्यावर आगपाखड करणे थांबवावे. त्यांनी जनतेचा कौल मान्य करण्यास शिकले पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी केली आहे.
आमच्यात हाच फरक
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात हाच नेमका फरक आहे. आमचा पराभव होतो, तेव्हा आम्ही तो मान्य करतो आणि त्यावरुन शिकण्याचा प्रयत्न करतो. विजयी पक्षाचे अभिनंदन करतो. काँग्रेस मात्र आपल्या अपयशाची जबाबदारी यंत्रणेवर ढकलण्याचा हास्यास्पद प्रयत्न करताना दिसते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आणखी एक नेते राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.
कोठे बेपत्ता होते?
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतगणना होत होती आणि काँग्रेसचा पराभव होणार, हे दुपारी बारा वाजण्याच्या आसपास स्पष्ट झाले होते, तेव्हा राहुल गांधी बेपत्ता झाले होते. मतगणना पूर्ण झाल्यानंतही अनेक तास त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मतदारांचे आभार मानायची औपचारिकताही त्यांनी पाळली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या युतीचा विजय होत असतानाही ते जनतेच्या समोर नव्हते. बुधवारी सकाळी त्यांनी दर्शन दिले आणि प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरुन ते राजकारण कशा पद्धतीने करतात याचे प्रत्यंतर येते, अशीही टीका होत आहे.
काँग्रेसमध्येच निषेधाचे आवाज
हरियाणातल्या पराभवानंतर आता काँग्रेसमध्येच निषेधाचे स्वर उमटू लागल्याचे दिसत आहे. काँग्रेसने हरियाणाची सर्व जबाबदारी भूपिंदरसिंग हुड्डा यांच्यावर सोडावयास नको होती. त्यामुळे पक्षातील इतर समाजाचे नेते नाराज झाले आणि त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली. कुमारी सेलजा यांच्यासारख्या ज्येष्ठ महिला नेत्यानेही स्वत:ला प्रचारापासून अलिप्त ठेवले. रणदीप सुरजेवालाही केवळ आपल्या मुलाच्या प्रचारात मग्न होते, अशी टीका आता काँग्रेसमधूनच केली जात आहे.