पुन्हा पराभव....
इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतास मोठी हार स्वीकारावी लागली. सध्या पराभव भारतीय संघाचा अक्षरश: पिच्छा पुरवत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आधी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतून उपांत्य फेरीपूर्वीच भारतीय संघ गारद झाला. त्याच दरम्यान भारतीय पुरुष संघाने आयर्लंडसारख्या कमकुवत संघाकडून 0-2 अशी हार पत्करली आणि काल मॅंचेस्टर येथे पुन्हा पराभव...
वास्तविक भारताने 190 अशी बऱ्यापैकी धावसंख्या रचली होती. पण ती निश्चित विजयासाठी पुरेशी नव्हती. वैभव सूर्यवंशी मधल्या यष्टीवरील चेंडू आडव्या बॅटने खेळला.. परिणाम अर्थातच यष्टिचीत झाला.
काल मॅंचेस्टर, ओल्ड ट्रॅफोर्डवर जोरदार थंड वारे वाहत होते. त्यामुळे चेंडू वळणार, दिशा बदलणार हे उघड होते. अशा वेळी विकेटवर टिकून राहणे जरुरीचे असते. उतावीळ फटके मारून चालत नाही. भारतीय फलंदाज इथेच कमी पडले, असे म्हणावे लागेल. अभिषेक शर्मा (43), इशान किशन (49), श्रेयस (37) तिलक वर्मा (24) यांनी डावास आकार देण्याचा प्रयत्न जरूर केला पण तो पुरेसा नव्हता. 200+ चे लक्ष्य ठेवणे जरुरीचे होते. यात भरीस भर म्हणजे भारताची निष्प्रभ गोलंदाजी. सध्या भारतीय चमूत फलंदाजांची वानवा नाही. इतके खेळाडू चमक दाखवत आहेत की कोणास अंतिम संघात खेळवायचे, कोणास वगळायचे, असा कधी कधी प्रश्न पडतो.
पण बुमराह, अश्विन आणि शमी यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची धार बोथट झाल्याचे दृश्य आहे. भेदक गोलंदाजी करून हमखास विकेट घेईल, असा कोण गोलंदाज आहे, निदान प्रतिपक्षांस अचूक गोलंदाजीने कोण जखडून ठेवू शकतो?
उत्तर आहे? वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई यांच्यात गुणवत्ता निश्चित आहे.. मग, बॉलींग कोच काय करतायत, असा प्रश्न येतो. या बाबींकडे नक्कीच लक्ष द्यावे लागेल.. अन्यथा फलंदाज कमवतात आणी गोलंदाज गमवतात, असा खेळखंडोबा पहावा लागेल. पहा..रवी बिश्नोईने 4 षटकात 60, वरुणने 37 धावा बहाल केल्या.
इंग्लंडने सुरुवातीस झटपट खेळाडू गमावले. परंतु नंतर बेथेल (76), ब्रुक (39) आणि बॅन्टन (39) यांनी अत्यंत संयमाने खेळ केला. दिशाहीन चेंडूना सीमापारचा रस्ता दाखवताना हयगय केली नाही. पण उतावीळ फटके मारले नाहीत.. त्यामुळेच खराब सुरुवात होऊन देखील जबाबदारीने आक्रमक खेळ केल्यामुळे विजयश्रीने इंग्लंडच्या पायावर लोळण घेतल्याचे पाहायला मिळाले.
पुढील सामना ट्रेन्ट ब्रिज. नॉटिंगहॅम येथे 7 जुलैला होईल.