पुरुषांची मानहानी...लाखोंची कमाई
सध्या सोशल मिडियाची चलती आहे. लोक या माध्यमातून आपल्या बऱ्यावाईट भावना व्यक्त करीत आहेत. आपल्या सुप्त इच्छा, आपल्या त्रुटी, आपला सणकीपणा इत्यादी वैशिष्ट्योही लोक सोशल मिडियावरुन मोकळेपणाने मांडत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींचे शोषण केले जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल केले जात आहे. तरीही लोक अशा माध्यमांवरुन उघडपणे त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत. याच प्रकारांमधून काहीजण आपला लाभ साधण्यासाठी कल्पक उपक्रम हाती घेत आहेत. असेच करुन कोट्यावधीची कमाई केलेल्या ब्रिटनमधील टिफनी सँटोझ नामक महिला धनाढ्या झाली आहे.
लोकांचा जाहीर अपमान करणे हा तिचा धंदा आहे. अनेकजणांना दिसायला रुपवान असणाऱ्या महिलेकडून स्वत:चा अपमान करुन घेण्याची हौस असते. वास्तविक ही एक मानसिक विकृती मानली पाहिजे. तथापि, असे केल्याशिवाय काही पुरुष स्वस्थ बसू शकत नाहीत. अशा पुरुषांची, स्वत:चा अपमान करुन घेण्याची अतीव इच्छा ही तरुणी अशा प्रकारे पूर्ण करीत आहे. अर्थातच ती या कामासाठी भक्कम मानधन घेते. पुरुषांना मारणे, यांना कुत्र्यांप्रमाणे गळ्यात साखळी अडकवून चालावयास लावणे, त्यांना शिव्या देणे असे अनेक मार्ग तिने पुरुषांचा अपमान करण्यासाठी शोधले आहेत. हे कार्य ती पुरुषांच्या इच्छेनुसारच करत असते, हे विशेष आहे. पुरुषांचा असा अपमान करुन, त्याची व्हिडीओग्राफी करुन हे व्हिडीओज या पुरुषांच्या अनुमतीनेच सोशल मिडियावर पोस्ट केले जातात. अनेक समाजधुरीणांना या प्रकारांसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे. समाजात अशी विकृती वाढू लागली तर ते समाजहिताच्या दृष्टीने योग्य असणार नाही, असे त्यांना वाटते. पण सध्याच्या सोशल मिडियाच्या युगात स्वत:च्या विकृत इच्छांनाही पूर्ण करुन घेण्याची आणि त्यांची दृष्ये सार्वजनिक करण्याची हौस असणाऱ्या माणसांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम काय होईल, हे नेमकेपणाने मांडणे आता समाजहितैषींनाही कठीण होऊ लागल्याचे दिसत आहे.