दीपू मल्लेश स्पीड क्लाइंबिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
आशियाई खेळांमध्ये पदार्पण करणाऱ्या 28 वर्षीय मल्लेशने, चार लेनच्या 15-मीटर उंच भिंतीवर लेन बी मधून चढताना 5.09 सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवली. 19 वर्षीय जोगा पुर्तीने पात्रता फेरीत नववे स्थान मिळवून महिलांच्या स्पीड क्लाइंबिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.भारताने आशियाई खेळांमध्ये स्पोर्ट क्लाइंबिंगमध्ये आजपर्यंत एकही पदक जिंकलेले नाही.
ज्युडोपटू अश्मिता डे कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत 
भारतीय ज्युडोपटू अश्मिता डे महिलांच्या 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या नारंतसेत्सेग गानबातारकडून कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.अश्मिताने हाँगकाँग चीनच्या का ली वोंगविरुद्ध आपली रेपचेज फेरी जिंकून कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला होता. अश्मिताने वोंगला 4-0 गोल्डन योको स्कोअरसह तंत्राने पराभूत केले. अंतिम फेरीत पोहोचलेल्या कझाकस्तानच्या अबिबा अबुझाकिनोवाकडून इप्पॉन स्कोरवर पराभूत झाली.
विपिन कुमार कुराश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत 
पुरुषांच्या 66 किलो वजनी गटातील स्पर्धेत विपिन कुमार उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच बाहेर पडल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची कुराश मोहीम संपुष्टात आली. 16 च्या फेरीतील या लढतीत भारतीय खेळाडू दक्षिण कोरियाच्या ह्योन्सू यूनकडून 0-3 ने पराभूत झाला. अशाप्रकारे भारताने कुराश स्पर्धेत एका पदकावरच समाधान मानले. सोमवारी, पिंकी बलहाराने महिलांच्या -78 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते.
सेपकटकरॉ : भारतीय पुरुष आणि महिला संघांचा पराभव
पुरुष आणि महिला सेपकटाक्रॉ संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या प्राथमिक गट सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.मायपाक अयेकपाम, प्रिया एलांगबाम, चाओबा ओइनम आणि मलेमनगानबी यांचा समावेश असलेल्या महिला संघाने व्हिएतनामकडून 7-15, 8-15 असा पराभव पत्करला आणि त्यानंतर फिलिपिन्सकडून 17-16, 10-15, 12-15 असा पराभव स्वीकारला. दुसरीकडे, राम कुमार शर्मा, मलेमनगानबा सोरोखैबाम, बॉबी कुमार आणि आकाश युमनम यांच्या पुरुष संघाने लाओकडून 9-15, 8-15 अशा पराभवाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पुरुष संघ आता व्हिएतनामशी सामना करेल.
कयाक आणि कॅनो एकेरीमध्ये राठोड, जगताप सहाव्या स्थानावर 
भारताचा प्रद्युम्न सिंग राठोड पुरुषांच्या कयाक एकेरीच्या अंतिम फेरीत सहाव्या स्थानी राहिला, तर महिलांच्या कॅनो एकेरीच्या अंतिम फेरीत पल्लवी जगतापही सहाव्या स्थानी राहिली. पुरुषांच्या कयाक एकेरीच्या अंतिम फेरीत, राठोडने सहा सेकंद वेळेच्या दंडासह 125.21 गुण मिळवले. दुसरा भारतीय खेळाडू हितेश केवट अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. महिलांच्या कॅनो एकेरीच्या अंतिम फेरीत, जगतापने 10 सेकंद वेळेच्या दंडासह 191.28 गुण मिळवून सहावे स्थान पटकावले. यापूर्वी उपांत्य फेरीत 211.77 गुण मिळवून तिने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. रीना सेन अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. तिने 269.99 गुण मिळविले.