गोलंदाजांच्या ‘वनडे’ क्रमवारीत दीप्ती शर्मा दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ दुबई
भारताची ऑफस्पिनर दीप्ती शर्मा तिच्या अलीकडच्या उत्कृष्ट फॉर्मच्या जोरावर गोलंदाजांच्या ताज्या ‘आयसीसी’ महिला एकदिवसीय क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकत्याच झालेल्या ‘आयसीसी महिला टी-20 विश्वचषका’तील काही दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हे स्थान तिला मिळाले आहे.
दीप्ती मायदेशी न्यूझीलंडविऊद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतील सुऊवातीच्या दोन सामन्यांत भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिली आहे. तिने दोन सामन्यांत 3.42 च्या इकोनॉमी रेटने तीन बळी घेतले आहेत. यामुळे दीप्ती दोन स्थानांनी बढती मिळून क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची ही वरिष्ठ फिरकीपटू आता अग्रक्रमांकावर असलेली इंग्लंडची गोलंदाज सोफी एक्लेस्टोनच्या जवळ पोहोचली आहे.
आघाडीच्या दहा खेळाडूच्या बाहेरच्या यादीतही काही बदल झाले आहेत. न्यूझीलंडची ली ताहुहू (तीन स्थानांनी बढती मिळून 12 व्या स्थानावर), अॅमेली केर (एका स्थानाने बढती मिळून 13 व्या स्थानावर) आणि सोफी डिव्हाईन (नऊ स्थानांनी बढती मिळून 30 व्या स्थानावर) यांनी अलीकडच्या ‘टी-20’ विश्वचषकातातील यशाच्या जोरावर प्रगती केली आहे.
डिव्हाईन (तीन स्थानांनी बढती मिळून आठव्या स्थानावर) आणि केर (एका स्थानाने बढती मिळून 11 व्या स्थानावर) यांनी एकदिवसीय फलंदाजांच्या ताज्या यादीतही चांगली प्रगती दाखवली आहे. त्यांची सहकारी सुझी बेट्स (दोन स्थानांनी बढती मिळून 15 व्या स्थानावर) आणि मॅडी ग्रीन (सात स्थानांनी बढती मिळून 18 व्या स्थानावर) यांना भारताविऊद्ध काही चांगल्या खेळींचा फायदा झालेला आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज (तीन स्थानांनी बढती मिळून 30 व्या स्थानावर) ही भारताच्या दृष्टीकोनातून एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील सर्वांत मोठी प्रगती करणारी खेळाडू ठरली आहे, तर दीप्ती (एका स्थानाने बढती मिळून तिसऱ्या स्थानावर) आणि डिव्हाईन (दोन स्थानांनी बढती मिळून सातव्या स्थानावर) या दोघींनीही एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या नवीन यादीत चांगली प्रगती दाखविली आहे.