दीपश्रीचा एजंट संदीपलाही कोठडीची हवा
माशेलचा रहिवासी जलस्रोत खात्यातील अभियंता : कातडी वाचविण्यासाठी बनला होता तक्रारदार ,44 जणांकडून 3. 88 कोटी पोचविले दीपश्रीला
फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोटी रूपयांना गंडविण्यात कमिशन एजंट म्हणून वावरणारा तारीवाडा-माशेल येथील रहिवासी आणि जलस्रोत खात्यातील अधिकारी संदीप जगन्नाथ परब याला म्हार्दोळ पोलिसांनी अखेर काल सोमवारी अटक केली आहे. फोंडा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने त्याची 3 दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. संदीप परब याने 44 लोकांकडून घेतलेले सुमारे 3.88 कोटी रूपये आपण ठकसेन दीपश्री सावंत गावस हिच्याकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी स्वत: म्हार्देळ पोलिसस्थानकात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्याच्या या तक्रारीनंतर या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली. माशेल एका इसमाने संदीप परब याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर म्हार्दो पोलिसांनी संदीपला अटक केली आहे. याप्रकरणी मास्टरमाईंड असलेली दीपश्री सावंत गावस ही फोंडा पोलिसांच्या कोठडीत असून आज मंगळवारी तिचा रिमांड संपत आहे.
संदीपला कठोर शिक्षा करा : जलस्रोतमंत्री शिरोडकर
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, आपल्या खात्यातील कनिष्ठ अभियंता नोकरी घोटाळ्यात गुंतलेला पाहून खूप वाईट वाटते. स्वत:सह त्याच्या कुटुंबियांनाही अडचणीत आणण्याचे कृत्य त्यांनी केलेले आहे. संशयिताविरोधात कडक कारवाई क्हावी, अशी मागणी मंत्र्यानी केली आहे. याप्रकरणी पोलिसांचे तपासकार्य योग्य दिशेने असून घोटाळ्यातील सर्वाना तुरूंगाची हवा खावी लागणार आहे, असेही शिरोडकर म्हणाले.