For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीपश्रीचा पोलिस मुक्काम वाढला

12:20 PM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दीपश्रीचा पोलिस मुक्काम वाढला
Advertisement

अजून 5 दिवस पोलिस कोठडीत रवानगी : तीन कारगाड्यांसह दोन दुचाकी जप्त

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार संशयित दीप़श्री सावंत गावस हिच्या पोलिस कोठडीच्या  मुक्कामात आणखी  5 दिवसांनी वाढ फेंडा प्रथम वर्ग न्यायालयाने केली आहे. ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात माशेल येथील शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून रू. 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड केलेल्या आयआरबी कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक व सुनिता पावसकर यांना अटक केल्यानंतर दीपश्री सावंत हिला फोंडा पोलिसांनी अटक केली होती.

जॉब स्कॅमप्रकरणी बिंग फुटल्यानंतर दीपश्री सावंत ही गायब झाली होती. ती बेळगांव येथे लपून बसली होती. मोबाईल फोनच्या लोकेशनद्वारे तिचा सुगावा लागल्यानंतर गोव्यात दाखल होताचा तिला फोंडा पोलिसांनी सोमवार 4 नोव्हे. रोजी अटक करण्यात आली होती. फोंडा पोलिसांनी तिच्याकडून 2 दुचाकी व 3 आलिशान गाड्या मिळून एकत्रित सुमारे 40 लाख रूपये किमतीची ही वाहने जप्त करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये ज्युपिटर स्कूटर जीए 04 पी 9667, व्हेस्पा जीए 04 आर 5028, कारगाडी स्वीफ्ट जीए 04 एच 0626, क्रेटा  जीए 04 एच 0722, हुंडाय इऑन जीए 03 पी 0543 याचा समावेश आहे.

Advertisement

फोंडा पोलिसांची लपाछपी कशासाठी?

फोंडा पोलिसांनी दीपश्री सावंत गावस हिच्या जप्त केलेल्या वाहनांबाबत कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस निरीक्षकानी याबाबत वेगळीच माहिती प्रसारमाध्यमांना पुरविल्याने दोन दिवस गेंधळ उडाला. तपास अधिकारी उपनिरीक्षक योगेश गावकर हे आहेत. पोलिस निरीक्षकांनी जप्त केलेली वाहने फर्मागुडी येथील वाहतूक पोलिसस्थानकाच्या तळावर ठेवण्यात आल्याची माहिती दिली. मात्र सर्व वाहने फोंडा पोलिसस्थानकाजवळच ठेवलेली आढळल्याने पोलिस कशासाठी हा लपाछपीचा खेळ करतात? असा सवाल उपस्थित होत आहे.

तालुक्यात जॉब स्कॅमच्या पाच तक्रारी

फोंडा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात फोंडा व म्हार्दोळ पोलिसस्थानकाच्या हद्दीत जॉब स्कॅमची तीन प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. त्यामध्ये म्हार्देळ पोलिसांनी पूजा नाईक व अजित सतरकर याला अटक केली होती, तर अन्य एक संशयित श्रीधर सतरकर याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. दुसऱ्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी सिंधुनगर कुर्टी येथील पशुवैद्यकीय डॉ. प्रकाश मुकुंद राणे (54) याच्याविरोधात 2019 ते 2022 या कालावधीत सुमारे 40 लाख रूपये घेतल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अटक झाली होती. तिसऱ्या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक याच्यासह मुख्याध्यापिका सुनीता शशिकांत पावसकर व दीपाश्री सावंत गावस या तिघांचा समावेश असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल यांच्याविरोधात सावर्डे येथील सदानंद विर्नोडकर इसनाने तक्रार दाखल केलेली आहे. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने संशयित सागरने रू. 10 लाखांना गंडा घातल्याची तक्रार  सोमवार 5 नोव्हे. रोजी दाखल करण्यात आली होती. ताज्या घडामोडीत काल गुरूवारी संदीप परब याने दीपश्रीला आपण सुमारे 44 बेरोजगारांना सरकारी नोकरीत रूजू करण्यासाठी रू. 3 कोटी 88 लाख दिल्याची तक्रार म्हार्दोळ पोलिसस्थानकात नोंद केली आहे.

Advertisement
Tags :

.