दीपश्री सावंत गँगचा अनिकेत खांडोळकर गजाआड
बेकार असूनही फ्लॅट, कार व दुचाकी
फोंडा : कॅश फॉर जॉब घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या दीपश्री सावंत गावस हिचा साथीदार अनिकेत अशोक खांडोळकर (27, राहणारा माशेल) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत हा या गैरव्यवहारात आपल्यासाठी काम करीत असल्याचे दीपश्री हिने चौकशी दरम्यान सांगितल्यानंतर काल सोमवारी सायंकाळी त्याला माशेल येथून अटक करण्यात आले. रिमांडसाठी त्याला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयासमोर उपस्थित केले असता तेरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. अनिकेत हा मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात यापूर्वी काम करीत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी कामावऊन काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कमाई नसतानाही अनिकेतकडे घबाड कसे?
अनिकेत हा दीपश्री हिचा अत्यंत जवळचा व विश्वासू साथीदार असल्याची माहिती उघड झाली आहे. कमाईचे कुठलेच ठोस साधन नसताना अनिकेतच्या नावावर तिवरे येथे ऊ. 25 ते 30 लाखाचा एक फ्लॅट, 8 लाखांची स्वीफ्ट कार व ऊ. 2.5 लाखांची बुलेट मोटारसायकल अशी गडगंज मालमत्ता आहे. फ्लॅट व ही वाहने खरेदी करण्यासाठी दीपश्री हिनेच त्याला पैसे दिल्याचे स्पष्ट होत आहे. दीपश्रीच्या या फसवणुकच्या कारनाम्यामध्ये तो तिला मदत करीत होता. अनिकेत याच्या अटकेमुळे काही लोकांचे धाबे दणाणले असून त्याने तोंड उघडल्यास अजून काहीजणांची नावे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.