For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीपसीकचा झटका...

06:35 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
डीपसीकचा झटका
Advertisement

चिनी एआय स्टार्टअप डीपसीकचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरु झालीय. याच्या प्रवेशाने अमेरिकेतील चीप उत्पादक, एआय कंपन्याही चिंतेत आहेत. भारतीय एआय कंपन्याही काहीशा सावटात आहेत. डीपसीक हे चिनी एआय स्टार्टअप असून नवोक्रमासाठी ओळखले जाते. 40 वर्षीय लियांग वेनफेंग हे संस्थापक, सीईओ असून त्यांचे नाव आता सर्वदूर पोहचले आहे. पत्नी, 2 मुलांसह असणाऱ्या लियांग यांची संपत्ती सुमारे 28 हजार कोटीची आहे, अशीही माहिती आहे. डीपसीक आर 1 हे एआय चॅटबॉट त्यांनी लाँच करत एकदम धक्काच दिला. सोमवारी जगभरातील अनेकांना आणि भारतीयांना डीपसीकच्या सादरीकरणाची माहिती मिळताच साऱ्यांनाच अचंबीत व्हायला झालं. सादरीकरणानंतर झटक्यात डीपसीकने आपली लोकप्रियता झळकवली आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरवर सर्वाधिक रेटिंग याला मिळालंय. यात महत्त्वाचे म्हणजे ओपन एआय चॅटजीपीटी आता मागे पडले आहे. सर्वात कमी म्हणजे 52 कोटी रुपये मोजून हे मॉडेल विकसित केल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे संस्थापक लियांग यांची डीपसीक ही कंपनी 2 वर्षापूर्वी स्थापन झालीय. अनेक एआय कंपन्या त्यांनी यापूर्वी सुरु केल्या आहेत.

Advertisement

जगातील जवळपास 500 हून अधिक श्रीमंतांचे सोमवारी 108 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. एनव्हीडीयाचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग यांचा यात समावेश होता. असे नुकसान होण्यामागचे मोठे कारण म्हणजे डिपसीक हे चिनी विकसित एआय मॉडेल होय. चीनने एआय मॉडेल डिपसीकचे सादरीकरण करत अमेरिकेसह अनेक देशांना धक्का दिला. कमी खर्चात चीनने डिपसीक हे नवे एआय मॉडेल सादर केले असून त्याचाच बोलबाला सोमवारपासून पाहायला मिळतो आहे. सोमवारी जागतिक टेक कंपन्यांचे तिथल्या शेअरबाजारात समभाग कोसळले. टेक संबंधीत निर्देशांक नॅसडॅक 3.1 टक्के इतका कोसळला आणि यात चिप निर्मात्या एनव्हीडीयाचा समभाग तर 17 टक्के घसरला. एकाच दिवसात कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 593 अब्ज डॉलर्सने साफ झाले. वॉलस्ट्रीटच्या इतिहासात कोणत्याही एका कंपनीचे भांडवल मूल्य इतक्या मोठ्या प्रमाणात घसरले नव्हते. यातल्याच ब्रॉडकॉमचा समभागही 17 टक्के, चॅट जीपीटी निर्मात्या मायक्रोसॉफ्टचे समभागही 2.1 टक्के व गुगलची सहकारी कंपनी अल्फाबेटचे समभाग 4 टक्के कोसळले. याने जगातील आघाडीवरच्या श्रीमंतांना 108 अब्ज डॉलर्सचे नुकसान झेलावे लागले. परिणाम असा की एनव्हीडीयाचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर्सने घसरण झाली. यासोबत ओरॅकल कॉर्पचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांची संपत्ती 22 अब्ज डॉलर्सने कमी झाली. डेल इंकचे मायकल डेलही यातून सुटले नाहीत. 13 अब्ज डॉलर्सचा फटका त्यांना झेलावा लागला. एकंदर डीपसीकच्या प्रवेशाने अनेकांची चिंता वाढवली आहे. यामुळे चीपची मागणी कमी होऊ शकते. या मॉडेलचा वापर करण्यासाठी ऊर्जा उत्पादनाची आवश्यकता कमी राहणार आहे. तसेच येणाऱ्या काळात डाटा सेंटर्सची गरजही कमी राहिल असं म्हटलं जात आहे. या साऱ्यात भारतीय एआय कंपन्या आता काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. सध्या तरी जगभरातच डीपसीक सर्वाधिक डाऊनलोड होतंय, हे खरं.

-दीपक कश्यप

Advertisement

Advertisement
Tags :

.