त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सर्वत्र दीपोत्सवाचे आयोजन
कोल्हापूर :
त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) शुक्रवार 15 रोजी असून शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी पहाटे तीन वाजता पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव आयोजन होत आहे. तब्बल 51 हजार दिवे लावले जाणार आहेत. गुरुवारी रात्रीपासूनच चार ते पाच हजार लोक पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव सोहळ्याला साजरा करण्यासाठी येत आहेत.
अंबाबाई, कात्यायनी मंदिरात आज दीपोत्सव...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने शुक्रवार 15 रोजी सायंकाळी अंबाबाई मंदिर व परिसरात दीपोत्सव केला जात आहे. तसेच रात्री साडे नऊ वाजता आयोजित केल्या जाणाऱ्या पालखी सोहळ्यापूर्वी मंदिरातील दीपमाळ पाजळली जाणार आहे. कात्यायनी देवस्थान व मैत्री हायकर्स यांच्या वतीने कात्यायनी मंदिर व परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात येईल. तब्बल 11 हजार दिव्यांनी कात्यायनी मंदिर व आवाराला उजळून सोडण्याचे नियोजन केले असल्याचे मैत्री हायकर्सचे अध्यक्ष प्रविण पोवार यांनी सांगितले.
पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रात्री पंचंगगा नदीघाटावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंडळातील ज्येष्ठ सदस्यांच्याच हस्ते प्रसाद वाटपाला सुरवात करण्यात आली.