पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिरात दीपोस्तव
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, दिव्यांनी परिसर उजळला
वार्ताहर/सांबरा
पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिरात श्रीदत्त संस्थांच्या वतीने गुरुवार दि. 13 रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दीपोस्तव साजरा करण्यात आला. श्री दत्त संस्थांनचे ट्रस्टी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते दीपोत्सव साजरा झाला. दैनंदिन अभिषेक,आरती व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर सायंकाळी आरतीने दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. शेकडो पणत्या प्रज्वलित करण्यासाठी लहान मुलांसह महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेकडो दिव्यांच्या स्निग्ध प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला होता. दीपोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. पाण्यावर काढण्यात आलेली श्री गणेशाची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शेवटी उपस्थित सर्व भाविकांना गोड प्रसादाचे वितरण करण्यात आले.