For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणा संघाच्या विजयामध्ये दीपिकाची हॅट्ट्रीक

06:22 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणा संघाच्या विजयामध्ये दीपिकाची हॅट्ट्रीक
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणाने आसामचा 15-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात हरियाणा संघातील दिपीकाने हॅट्ट्रीकसह 5 गोल केले. त्याचप्रमाणे विद्यमान विजेत्या मध्य प्रदेशने बिहारचा 7-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

हरियाणा आणि आसाम यांच्यातील सामन्यात दिपीकाने दुसऱ्या, 40 व्या, 42 व्या, 49 व्या आणि 56 व्या मिनिटाला असे 5 गोल नोंदविले. दिपीकाने यापैकी 2 गोल पेनल्टी कॉर्नरवर तर 3 मैदानी गोल केले. सदर सामना पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये खेळविला गेला. हरियाणातर्फे शर्मिला देवीने तिसऱ्या आणि 35 व्या मिनिटाला, महिमा चौधरीने 15 व्या आणि 47 व्या मिनिटाला, उदिताने 32 व्या आणि 36 व्या मिनिटाला असे 2 गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. नेहा गोयलने 8 व्या मिनिटाला, नवनित कौरने 26 व्या, एकता कौशिकने 44 व्या आणि ज्योतीने 50 व्या मिनिटाला गोल केले. या स्पर्धेतील हरियाणाचा हा पहिला विजय असून आता ते ड गटातून 3 गुणासह पहिल्या स्थानावर आहेत. या गटात पुडूचेरी हा दुसरा संघ आहे.

Advertisement

इ गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात ओडिशाने गोव्याचा 9-1 अशा गोलफरकाने पराभव केला. ओडिशा संघातर्फे दिप्ती लाक्राने 5 व्या आणि 12 व्या मिनिटाला, दिपी मोनिका टोपोने 10 व्या आणि 51 व्या मिनिटाला, अतेन टोपनोने 12 व्या आणि 34 व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय जीवन किशोरी टोपोने 29 व्या, नितू लाक्राने 57 व्या आणि अनुपा बर्लाने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. गोवा संघातर्फे एकमेव गोल 47 व्या मिनिटाला गीता राठोडने केला. या स्पर्धेतील ओडिशाचा हा पहिला विजय आहे. फ गटातील सामन्यात पंजाबने राजस्थानचा 11-2 असा फडशा पाडला. पंजाब संघातर्फे सरबदीप कौरने हॅट्ट्रीक नोंदविली. तरनप्रित कौरने तसेच किरणदीप कौरने प्रत्येकी 2 गोल केले.

विद्यमान विजेत्या मध्य प्रदेशने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना बिहारचा 7-1 असा पराभव केला. मध्य प्रदेशतर्फे ऋतिका सिंगने हॅट्ट्रीक नोंदविली. ऐश्वर्या चव्हाण, प्रिती दुबे, कांचन निधी करकेटा, कर्णधार इशिका चौधरी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. बिहारतर्फे एकमेव गोल इबा करकेटाने केला. अ गटातून आता मध्य प्रदेशने बाद फेरी गाठली आहे. याच गटातील उत्तर प्रदेश आणि झारखंड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. अन्य सामन्यात तेलंगणा आणि बंगाल यांनी शानदार विजय नोंदविले. तेलंगणाने गुजरातचा 12-0 तर बंगालने तामिळनाडूचा 2-0 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.