भालाफेकमध्ये दीपांशूला सुवर्ण
रोहन यादव, प्रियांशू, रितिक यांना रौप्यपदके
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दुबईत सुरू झालेल्या 21 व्या यू-20 आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप्समध्ये भारताच्या दीपांशू शर्माने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय अॅथलीट्सनी चांगले प्रदर्शन केले. दीपांशूने 70.29 मी. भालाफेक करीत सुवर्ण मिळविले तर रोहन यादवने 70.03 मी. भालाफेक करीत रौप्य मिळविले. पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या प्रियांशूने 3:50.85 मि. अवधी घेत रौप्य मिळविले. सकाळच्या सत्रात रितिकनेही पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रौप्य मिळविले तर प्राची अंकुश देवकरचे महिलांच्या 3000 मी. शर्यतीचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचे मध्यम पल्ल्याचे व स्प्रिंटच्या अॅथलीट्सनीही प्राथमिक फेरीत यशस्वी कामगिरी केली.
महिलांच्या 800 मी. शर्यतीत लक्षिता विनोद सँडलिया व तन्वी मलिक यांनी पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. हीट्समध्ये लक्षिताने 2:09.39 से. वेळ नोंदवत दुसरे तर तन्वीने 2:12.82 से. वेळ घेत चौथे स्थान मिळविले. महिलांच्या 400 मी.शर्यतीत अनुष्का दत्तात्रय कुंभार व संगीता दोदला यांनीही पदकाच्या फेरीत स्थान मिळविले. हीटमध्ये अनुष्काने 55.75 सेकंद अवधी घेत पहिले तर संगीताने 56.21 से. वेळ नेंदवत दुसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या 400 मी. शर्यतीत अमन चौधरी 48 सेकंद वेळ घेत हीटमध्ये पहिले स्थान घेत पदकाच्या फेरीत स्थान मिळविले याच प्रकारात महिलांमध्ये जेयाविंधीया जगदीश व श्रीया राजेश यांनी महिलांच्या 400 मी. हर्डल्समध्ये पदकाची फेरी गाठली आहे. थाळीफेकमध्ये रितिकने पहिल्या थ्रोमध्यें 49.97 मी. थाळीफेक केली. दुसरा प्रयत्न वाया गेल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 52.23 मी. फेक करीत पदक निश्चित केले. त्याचा चौथा प्रयत्नही वाया गेल्यानंतर पाचव्या प्रयत्नात 50.35 मी. आणि शेवटच्या सहाव्या प्रयत्नात 53.01 मी. फेक केली. कतारच्या डिब्राईन आदम अहमतने 54.80 मी. थाळीफेक करीत सुवर्ण व सौदी अरेबियाच्या हसन मुबारक अलाहसाईने 50.41 मी. फेक करीत कांस्यपदक मिळविले.