शंभर कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी दीपाली परब गजाआड
मडगाव : सुमारे 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी असलेल्या दीपाली परब या संशयित महिला आरोपीला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रातील कल्याण-मुंबई येथून अटक केली आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल मंगळवारी पत्रकारांना दिली. भारतीय न्याय संहितेच्या 406, 420 तसेच गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स (इन फायनान्शियल इस्टब्लीशमेंट) अॅक्ट 1999 च्या 3 व 4 कलमाखाली या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मायरनची पहिली पत्नी सुनिता
शंभर कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गोवा पोलिसानी यापूर्वीच मडगावच्या सत्र न्यायालयात आरोपपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात मायरन रॉड्रिग्स (फरारी) हा या घोटाळाप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मायरन याची पहिली पत्नी सुनिता रॉड्रिग्स हिला यापूर्वीच गोवा पोलिसांनी अटक केली होती आणि त्यानंतर न्यायालयाने तिला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
महाराष्ट्र पोलिसांनाही हवी दीपाली
मडगावच्या सत्र न्यायालयाने तिला जामिनावर सोडल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केली होती. महाराष्ट्रात सुनिता रॉड्रिग्स हिच्याविरुद्ध एमएचबी पोलिस स्थानकात गुन्हा (क्रमांक 12/2024) नोंद आहे. भारतीय दंड संहितेच्या 406, 409, 420 कलमाखाली त्याचप्रमाणे एमपीआयडी कायद्याच्या 3 व 4 कलमाखाली महाराष्ट्रातील या पोलिसांनी सुनिता रॉड्रिग्स हिला अटक केली आहे. दीपाली परब हिच्याविरुद्धही महाराष्ट्रातील एमएचबी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद असून तेथील पोलिसही तिच्या शोधार्थ आहेत, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली.
ज्यावेळी मडगावच्या न्यायालयात गोवा पोलिसांनी 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र सादर केले त्यावेळी संशयित आरोपी दीपाली परब ही फरारी असल्याची माहिती पोलिसानी दिली होती. गोवा पोलिस खात्याच्या ‘इकोनोमिक ऑफेन्सेस सेल’ पोलिसांनी मडगावच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर केलेले आहे. या प्रकरणात अनेक मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या असून संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स (फरारी) व दीपाली परब संशयित आरोपी आहेत.
लवकरच रेड कॉर्नर नोटीस
संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली असून लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही रेड कॉर्नर नोटीस जारी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.