दीपक वायंगणकर निलंबित
दक्षता खात्याच्या संचालकांची कारवाई : कामुर्लीतील बेकायदा म्युटेशन प्रकरण
म्हापसा : बार्देश तालुक्यातील कामुर्ली कोमुनिदादच्या 4,10,825 चौ.मी जमिनीचे अब्दुल रेहमान लतीफ शेख याच्या नावे म्युटेशन करण्यासाठी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक दीपक वायंगणकर यांनी दिलेली मान्यता बेकायदेशीर असल्याने माजी प्रशासक तथा सध्या वाळपईचे उपजिल्हाधिकारी असलेल्या दीपक वायंगणकर (उर्फ मुन्ना) यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी दीपक वांयगणकर यांनी दिलेला ना हरकतीचा आदेश बेकायदा असल्याची तक्रार कामुर्ली कोमुनिदादने व गावकऱ्यांनी सरकारी यंत्रणेकडे केली होती. दक्षता खात्याच्या संचालक यशस्वीनी बी यांनी वायंगणकर यांना सेवेतून निलंबित केले आहे. कोमुनिदादच्या जमिनीच्या म्युटेशनसाठी कोमुनिदादचा ठराव आणि मंजूरी मिळण्याची गरज आहे. प्रशासकांना थेट ना हरकत दाखला देण्याचा अधिकार नाही. तरीही मुन्ना यांनी हा दाखला थेट दिला आहे. कामुर्ली कोमुनिदादचा गावकार नसलेल्या व्यक्तीला म्युटेशनसाठी ना हरकत दाखला दिल्याचा ठपका ठेवून दीपक वायंगणकर (मुन्ना) याला दक्षता खात्याने निलंबित केले आहे.
बेकायदेशीर मृत्यूपत्र
कामुर्ली कोमुनिदादच्या एका गावकऱ्याने चिखली येथे राहणाऱ्या अब्दुल रेहमान लतीफ शेख यांच्या नावे 16 ऑक्टोबर 2019 रोजी मृत्यूपत्र (व्हील) नोंद केले होते. त्यावेळी प्रशासक असलेल्या वायंगणकर यांनी आपल्या ना हरकत आदेशात या मृत्यूपत्राची नोंद करून त्याची खातरजमा वरिष्ठ श्रेणी नागरी न्यायालय म्हापसा यांनी केल्याचे म्हटले आहे. ज्याअर्थी न्यायालयाने याला मान्यता दिली आहे, त्याअर्थी हे मृत्यूपत्र प्रामाणिक आहे असे समजून या जमिनीचे अब्दूल रेहमान लतीफ शेख यांच्या नावे म्युटेशन करण्यास काहीच हरकत नाही, असे वायंगणकर यांनी आपल्या आदेशात म्हटले होते.
अब्दुल रेहमानची नोंदच नाही
अब्दुल रेहमान लतीफ शेख यांच्या नावे मृत्यूपत्र तयार करणारा गांवकार हा कामुर्ली कोमुनिदादचा घटक आहे. परंतु अब्दुल रेहमान ही व्यक्ती कुठेच कोमुनिदादची कुळ किंवा वहिवाटदार असल्याची नोंद नाही. तरीही जमीन अब्दूल रेहमान लतीफ शेख यांच्या नावे गांवकऱ्याने केलीच कशी? असा सवाल उपस्थित झाला होता. हे मृत्यूपत्र नेमके कोणत्या आधारावर आणि कोणत्या निमित्ताने केले याचाही सखोल तपास व्हायला हवा अशी कामुर्ली कोमुनिदादची भूमिका होती.
स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलापासून उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत
गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी दीपक वायंगणकर यांना कामुर्ली परिसरात मुन्ना म्हणूनच ओळखले जाते. ते कामुर्लीच्या शेजारी शिवोली गांवचे रहिवासी आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या गटातून नोकरी मिळवून पंचायत सचिव, त्यानंतर गट विकास अधिकारी ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत झेप घेतली. अब्दूल रेहमान यांच्या म्युटेशनाचे हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणी पूर्वीच्या कोमुनिदाद प्रशासकांनी निर्णय घेतला नव्हता. परंतु आठ दिवसांपूर्वी मुन्ना यांची बदली उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकपदी झाली. त्यावेळी त्यांनी हा आदेश जारी केला. आश्चर्याची बाब म्हणजे हा दाखला दिल्यानंतर लगेच त्यांची पुन्हा पुर्वीच्या ठिकाणी बदली झाली.