मालवणी करंडकात रंगली राजकीय रंगत
दीपक केसरकर आणि बबन साळगावकर एकाच व्यासपीठावर, मात्र अबोला कायम
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडीत मालवणी करंडक स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारा एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. एकेकाळचे सहकारी आणि नंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ठरलेले दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, दोघांमध्ये कोणताही संवाद न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.मालवणी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या करंडक स्पर्धेला स्थानिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगतदार झाला असला तरी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते केसरकर आणि साळगावकर यांच्या उपस्थितीने. व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसलेले असतानाही दोघांमध्ये औपचारिक अभिवादनदेखील झाले नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.केसरकर आणि साळगावकर हे काही वर्षांपूर्वी राजकीयदृष्ट्या एकाच गोटात कार्यरत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा पातळीपर्यंत दोघांनी एकत्रित काम केल्याची उदाहरणे आहेत. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत साळगावकर यांनी केसरकर यांच्या विरोधात उभे राहत थेट आव्हान दिले. त्या निवडणुकीनंतर दोघांमधील दुरावा अधिकच वाढला .निवडणूक संपल्यानंतरही या दोघांमध्ये संवाद प्रस्थापित झाला नसल्याची चर्चा अधूनमधून होत असते. सोमवारी झालेल्या कार्यक्रमातही त्याचीच प्रचिती आल्याचे दिसून आले. दोघांनी आपापल्या भाषणांत मालवणी संस्कृती, स्थानिक विकास आणि तरुणांना संधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली; मात्र एकमेकांचा उल्लेख टाळल्याचे जाणकारांनी नमूद केले.