For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भिरवंडे गावच्या एसटी फेऱ्या पूर्ववत आणि वेळेवर सोडण्याचे दीपक घोडे यांचे आश्वासन

भिरवंडे गावच्या एसटी फेऱ्या पूर्ववत आणि वेळेवर सोडण्याचे दीपक घोडे यांचे आश्वासन
Advertisement

कनेडी | वार्ताहर : कणकवली आगारातून गेल्या काही महिन्यांपासून कणकवली-भिरवंडे एसटी बसफेऱ्या अनियमितपणे सुरू होत्या. तसेच, काही फेऱ्या भिरवंडेमार्गे न जाता व्हाया कुंभवडे मार्गे सोडण्यात येत असल्याने विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक दीपक घोडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

Advertisement

यावेळी, चालक-वाहकांची कमतरता किंवा बसची उपलब्धता कमी असल्याचे कारण देत बसफेऱ्या व्हाया कुंभवडे मार्गे सोडल्या जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांना कनेडी बाजारपेठेत उतरून बस कुंभवडेहून परत येण्याची वाट पाहावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच, बसफेऱ्यांच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली. पूर्वीप्रमाणे निश्चित वेळेत बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावर विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सर्व बसफेऱ्या व्हाया न सोडता पूर्ववत मार्गावर आणि नियोजित वेळेनुसार सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच, यासंदर्भात आवश्यक सूचना कणकवली आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार विनय सावंत, भिरवंडे सोसायटीचे माजी चेअरमन संतोष सावंत, गांधीनगरचे सरपंच मंगेश बोभाटे तसेच ग्रामस्थ श्रीकांत सावंत, प्रकाश सावंत, संदीप उर्फ सॅडू सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.